राजकीय दबावामुळे मामा भांजे अतिक्रमणांवर कारवाईस टाळाटाळ

अतिक्रमणमुक्त होईपर्यंत लढा सुरूच राहणार-मनसे

ठाणे : ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरमधील मामा-भांजे डोंगरावरील ‘लॅड जिहाद’ मनसेने उघडकीस आणल्यानंतर वनविभागाने केवळ कागदोपत्री कारवाई केल्याचा थेट आरोप मनसेने केला आहे.

अधिवेशनातही याबाबत विचारणा होऊनही अद्याप कारवाई केली जात नसून भारतीय वायुसेनेच्या सुरक्षेबाबत प्रशासन ढिम्म असल्याचे दिसून येत आहे. केवळ राजकीय दबावामुळे कारवाईस टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप मनविसेचे राज्य सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी केला आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, येऊन वनक्षेत्रातील मामा-भांजे दर्ग्याच्या अतिक्रमणाचा विषय गाजत आहे. मनसेने या ठाण्यातील ‘लँड जिहाद’ विरुद्ध आवाज उठविला आणि वनविभागाला जाग आली. वन विभागाकडून विभागाकडून दर्ग्याच्या अतिक्रमणाबाबत ट्रस्टचे अध्यक्ष आणि सचिवांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर जून महिन्यात याबाबतची सुनावणीही घेण्यात आली, पण यामध्ये ट्रस्टने कोणतेही वैध पुरावे सादर केले नाहीत. यानंतर वन विभागाकडून हे अतिक्रमण हटविणे अपेक्षित असतानाही अद्यापही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नसल्याचे पाचंगे यांनी स्पष्ट केले. ट्रस्टच्या वतीने केवळ कबर शेड, ओपन शेड स्वत:हून हटविले असून काही दिवसात घराचे अतिक्रमणही काढण्यात येणार असल्याचे वनविभागाने सांगितले आहे. मात्र वनविभागावर असलेल्या राजकीय दबावामुळे या अतिक्रमणाबाबत केवळ कागदोपत्रीच कारवाई केली जात असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई केवळ जुजबी केली जात असून संपूर्ण अतिक्रमण हटवेपर्यंत मनसेचा लढा सुरूच राहणार असल्याचे पाचंगे यांनी सांगितले.

पर्यटकांचा राबता असलेल्या येऊरमधील या मामा-भांजे दर्गा परिसरात भारतीय वायुसेनेच्या तळाला धोका असल्याचे वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी सांगूनही वनविभाग मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे.

मामा भांजे परिसरात नव्याने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. वन विभाग राजकीय दबावामुळे अतिक्रमण हटविण्यास टाळाटाळ करत आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एक एकरापेक्षा जास्त जागेवर कब्रस्तान उभारले आहे. तरीही प्रशासन ढिम्म आहे. एअर फोर्ससारख्या सुरक्षा यंत्रणांच्या तक्रारीनंतर देखील वन विभाग तात्काळ कारवाई करत नाही. स्वतःहून काही अतिक्रमण काढले असले तरीही जोपर्यंत संपूर्ण अतिक्रमण हटविले जात नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार आहे, असे संदीप पाचंगे यांनी सांगितले.