अनधिकृत व्यवसायांनी केले रस्ते आणि चौक गिळंकृत

गावगुंड घेतात हप्ते, पालिकेचे दुर्लक्ष

ठाणे: ठाणे शहरातील रस्ते आणि चौक उसाचा रस, वडापाव आणि नारळ-पाणीवाल्यांनी गिळंकृत केले असून उसाचा रस विकणारे सर्रासपणे चोरीची वीज वापरत असल्याचे उघडकीस आले आहे. गावागुंडांच्या आशिर्वादामुळे सुरु असलेले हे धंदे बंद करून ठाणेकरांना रस्ते कधी मोकळे करून देणार असा सवाल ठाणेकर विचारत आहेत.

ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी रुजू होतच आयुक्त सौरभ राव यांनी ठाण्यातीन अनधिकृत बांधकामे आणि रस्ते अडवणाऱ्या फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करणार असल्याचे जाहीर केले होते. महापालिकेने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे, परंतु उसाचा रस, वडापाव आणि नारळ पाणी विकणारे हे मागील एक ते दीड महिन्यापासून हा व्यवसाय करत असून बिनधास्तपणे शहरातील रस्ते अडवून स्वतःची संस्थाने निर्माण केली आहेत. महापालिकेचे अधिकारी त्या मार्गाने जातात, परंतु त्या अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करत नाहीत. सेंट जॉन शाळेसमोरील रस्ता अरुंद आहे. तेथे देखिल वडापावची गाडी थाटात लावण्यात आली आहे. हरिनिवास सर्कल येथिल मारुती मंदिर येथे रस्ता अडून वडापाव विकला जात आहे तर ओपन हाऊस येथिल चौकात उसाचा रस विकणारा चोरीची वीज वापरून आपला धंदा करत असल्याचे जागरूक ठाणेकरांनी ठाणेवैभवच्या निदर्शनास आणून दिले आहे.

या अनधिकृत फेरीवाल्यांकडून गावगुंड प्रत्येकी पाचशे ते हजार रुपये हप्ता वसुल करत आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना राजकीय नेत्यांची धमकी देऊन किंवा आर्थिक व्यवहार करून खुलेआम रस्ते अडवण्याचे काम सुरु असल्याचे ठाणेकरांचे म्हणणे आहे. या पूर्वी रस्ते अडवून जागा देण्यावरून पाचपाखाडी महापालिका भवन येथे दोन गटात मारामारी देखिल झाली होती. महापालिका भवनाला देखिल या फेरीवाल्यांनी विळखा घातला आहे, त्यामुळे हे फेरीवाले महापालिकेच्या आशिर्वादामुळे बसले आहेत का असा सवाल पाचपाखाडी भागातील श्री. मुळे यांनी उपस्थित केला आहे.

नवीन महापालिका आयुक्त शहराचे भले इच्छिणारे आहेत. त्यांनी फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करून रस्ते आणि पदपथ मोकळे करून द्यावेत, अशी मागणी जागरूक ठाणेकरांनी केली आहे.

ठामपा मुख्यालयासमोर पदपथ गिळंकृत
ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोर फूड व्हॅन कायम उभी असून संध्याकाळी या अनधिकृत व्यवसायामुळे रस्त्यात वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो. मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कचराळी तलावाला लागूनच चप्पल दुकानाच्या आड नवीन टपरी निवडणुकीची संधी साधून सुरू झाली आहे. तर चंदनवाडी रुपादेवी येथील नाल्यालगत चायनीज गाड्या सायंकाळी थाटल्या जातात. जर महापालिका मुख्यालयालगत सुरू असलेल्या या अनधिकृत व्यवसायांवर कारवाई केली जात नसेल तर शहराचे कल्याण कसे होणार, असा प्रश्न जागरुक नागरिक विचारत आहेत.