शहापूर तालुक्यात अवकाळी पावसाचे थैमान

आदिवासी बांधवांचे नुकसान

शहापूर: गेल्या अनेक दिवसांपासून शहापूर तालुक्यात वादळी पावसाने हाहाकार उडविला असून आज साकडबाव पठारावरील आदिवासी वाड्यांमध्ये अवकाळी पाऊस व वादळाने थैमान घातल्याने आदिवासी बांधव उघड्यावर पडले आहेत.

शहापूर तालुक्यातील साकडबाव पठारावरील जळक्याचीवाडी व पोकळ्याचीवाडी येथील आदिवासी वाड्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले असून अनेक घरांचे पत्रे, कौले उडाल्याने त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने परिसरातील विजेचे खांब, वीज वाहिन्या व सर्वात महत्वाचे वीज रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) कोसळून खाली पडले. त्यामुळे विजेअभावी पंचवीस गाव व पाडे अंधारात सापडले आहेत. रस्त्यालगत असलेली झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

जळक्याचीवाडी व पोकळ्याचीवाडी येथील किसन पोकळा, कुशी पोकळा, गोपाळ पोकळा, कालुराम पोकळा, प्रकाश पोकळा, कुसुम पोकळा, जयराम पोकळा, हरीचंद्र फसाळे, किसन खडके, गणपत शिंगे, सखाराम फसाळे, रविंद्र फसाळे, हर्षला शिंगे यांचे घरांचे नुकसान झाले असून त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत.