चार वर्षानंतर प्रशासकीय राजवट संपुष्टात
उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील यांनी स्वीकारला पदभार
ठाणे : ठाणे महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेना शिंदे गटाच्या शर्मिला पिंपळोलकर यांची २३व्या महापौरपदी तर भाजपचे कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे चार वर्षांची प्रशासकीय राजवट संपुष्टात आली आहे. आता पालिकेचा कारभार महापौर आणि उपहापौरांच्या नेतृत्वाखाली चालणार आहे.
ठाणे महापालिका निवडणुक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे ७५, भाजपचे २८, राष्ट्रवादी (शरद पवार) १२, राष्ट्रवादी (अजित पवार) नऊ, एमआयएम पाच, उध्दव ठाकरे गट एक, अपक्ष एक असे १३१ नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणूक निकालानंतर ३ फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुक जाहीर झाली. सत्ता स्थापनेसाठी ६६ नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक आहे. परंतु शिंदे गटाने एकहाती सत्ता आणली. त्यात एका अपक्ष नगरसेवकाने पाठिंबा दिल्यामुळे हे संख्याबळ ७६वर गेले आहे.
ठाणे महापालिकेची निवडणूक युतीत लढविण्यात आली असल्यामुळे महापौर पद द्या अन्यथा विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावू, असा हट्ट भाजपने धरला होता. मात्र, दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि यामुळे महापौर आणि उपहापौर पदासाठी अर्ज दाखल करतेवेळी भाजपने महापौर पदाचा हट्ट सोडत शिंदे गटासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शिंदे गटाकडून महापौर पदासाठी शर्मिला पिंपळोलकर तर भाजपतर्फे उपमहापौर पदासाठी कृष्णा पाटील यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल झालेले नसल्यामुळे दोघांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणुकीच्या दिवशी म्हणजेच ३ फेब्रुवारी रोजी केवळ अधिकृत निवडीची औपचारीकता शिल्लक राहिली होती.
ठाणे महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम केले तर, मनीष जोशी यांनी सचिव म्हणून काम पाहिले.
महापौर पदाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर महापौर दालनातील खुर्चीत महापौर शर्मिला पिंपळोलकर विराजमान होतील अशी अपेक्षा होती. परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या दौऱ्यात असल्याने शर्मिला या महापौर खुर्चीत बसल्या नाहीत.
महापौर पदासाठी आठ जणांच्या नावांची चर्चा होती, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर विश्वास दाखविल्याने मला संधी मिळाली आणि आता त्याच संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी दिली.
जल्लोषावरून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र

अजित दादांचे दु:ख अजून डोक्यातून गेलेले नाही. जास्त जल्लोष करणार नाही असे जाहीर केले असतांना देखील हा जल्लोष केला गेला, याचे दुःख वाटते, अशी नाराजी शरद पवार गटाचे गटनेते शानू पठाण यांनी व्यक्त केली.