कल्याणच्या महापौरपदी हर्षाली चौधरी तर उपमहापौरपदी दामले

अखेर सहा वर्षांची प्रतीक्षा संपली

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची आज निवड झाली असून सहा वर्षांपासून असलेली राजकीय राजवट आज संपुष्टात आली आहे. महापौर पदासाठी ॲड. हर्षाली चौधरी-थवील आणि उपमहापौर पदासाठी राहुल दामले यांची निवड करण्यात आली आहे.

महापौर पदासाठी ॲड. हर्षाली चौधरी-थविल आणि उपमहापौर पदासाठी राहुल दामले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झालीच होती. आजच्या महासभेत मुंबई जिल्हाधिकारी आचल गोयल या पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होत्या, त्यांनी औपचारिक घोषणा केली. यावेळी व्यासपीठावर महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल, सचिव किशोर शेळके उपस्थित होते.

कोरोना काळात नोव्हेंबर २०२० रोजी नगरसेवकांचा कार्यकाल संपल्याने राजकीय राजवट सुरु झाली होती. कोरोना तसेच विविध कारणांमुळे महानगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या होत्या. गेल्या महिन्यात निवडणुका संपुष्टात येऊन अखेर सहा वर्षानंतर प्रतीक्षा संपली आहे. आज महापौर, उपमहापौर पदाची निवड झाली आहे. 1983 नंतरची सर्वात मोठी असणारी प्रशासकीय राजवटही आता संपुष्टात आली आहे. 1983 मध्ये कल्याण-डोंबिवली महापालिका स्थापन झाल्यानंतर लागू झालेली प्रशासकीय राजवट तब्बल 1995 पर्यंत म्हणजेच तब्बल 12 वर्षे होती. त्यानंतर कोविडमुळे 2020 मध्ये कार्यकाळ संपल्याने महानगरपालिकेवर प्रशासकीय राजवट लागू झाली होती. मात्र आता महापौर आणि उपमहापौर पदाची निवड झाल्याने गेल्या सहा वर्षांपासून असलेली ही प्रशासकीय राजवटही संपुष्टात आली आहे. या निवड प्रक्रियेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सभागृहाद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली.

या महापौर आणि उपमहापौर निवडीच्या विशेष सभेमध्येच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमधील टोलवा टोलवी दिसून आली. आपल्या हजरजबाबीपणासाठी प्रसिद्ध असणारे शिवसेनेचे नगरसेवक सचिन पोटे यांनी शिवसेना उबाठाचे गटनेते यांना जोरदार टोला लगावला. “तुम्ही निवडून आले तेव्हा क्रिकेटची टीम होती, मात्र इकडे सभागृहात येईपर्यंत ती कबड्डीची झाली” या शब्दांत सचिन पोटे यांनी शाब्दिक कोटी केलेली पाहायला मिळाली. त्यावेळी सभागृहात एकच हशा पिकला होता.

हर्षाली चौधरी कल्याणच्या आठव्या महिला महापौर

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आतापर्यंत १३ महापौर होऊन गेले असून ॲड. हर्षाली चौधरी थविल या १४ व्या महापौर आहेत तर महिला महापौर आठव्या ठरल्या आहेत. पहिल्या महापौर आरती मोकल यांचा कार्यकाल १३-१०-१९९५ ते १२-१०-१९९६, दुसरे महापौर रमेश दळवी १३-१०-१९९६ ते १२-१०-१९९७, तिसरे महापौर शरयू प्रधान यांचा कार्यकाळ १३-१०-१९९७, ते १२-१०-१९९८, चौथे महापौर अनिता दळवी यांचा कार्यकाळ १३-१०-१९९८ ते १२-१०-१९९९, पाचवे महापौर शाहू सावंत यांचा कार्यकाळ १३-१०-१९९९ ते १२-१०-२०००, सहावे महापौर मंगल शिंदे यांचा कार्यकाल १३-१०-२००० ते १२-४-२००३, सातवे महापौर हरिश्चंद्र पाटील यांचा कार्यकाळ १३-४-२००३ ते १२-१०-२००५, आठवे महापौर पुंडलिक म्हात्रे यांचा कार्यकाळ ११-११-२००५ ते ११-५-२००८, नववे महापौर रमेश जाधव यांचा कार्यकाळ ११-५-२००८ ते १०-११-२०१०, दहावे महापौर वैजयंती गुजर-घोलप यांचा कार्यकाळ १२-११-२०१० ते १०-५-२०१३, अकरावे महापौर कल्याणी पाटील यांचा कार्यकाळ ११-५-२०१३ ते १०-११-२०१५, बारावे महापौर राजेंद्र देवळेकर यांचा कार्यकाळ ११-११-२०१५ ते १०-५-२०१८, तेराव्या महापौर विनिता राणे यांचा कार्यकाळ ११-५-२०१८ ते आणि सध्याच्या नवनिर्वाचित महापौर हर्षाली चौधरी-थवील ह्या चौदाव्या महापौर ठरल्या आहेत.