नवी मुंबई : यंदा पाऊस लांबणार असून सरासरीपेक्षा कमी पडणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे राज्यशासनाने पाणी वापराबाबत कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना सर्व महापालिकांना दिल्या आहेत. त्यानुसार नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने शहरात २८ एप्रिलपासून विभागवार आठवड्यातून एक दिवस संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
स्वतः च्या मालकीचे धरण असल्याने जलसंपन्न महापालिका म्हणून नवी मुंबई शहराची आज ओळख आहे. नवी मुंबई शहराला मोरबे धरणातून पाणीपुरवठा होत असतो. सध्या या धरणात २० सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. मात्र अल-निनो समुद्र प्रवाह सक्रियतेच्या प्रभावामुळे यावर्षी पाऊस लांबणार असल्याचा तसेच पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याच्या हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार संभाव्य पाणी टंचाई निवारण्याकरीता विशेष कृती आराखडा तयार करणेबाबत महापालिकेस सुचना दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राची पाणी पुरवठयाची गरज लक्षात घेता मोरबे धरणाच्या उपलब्ध पाणी साठ्यातून पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये विभागवार आठवड्यातून एक दिवस संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद करून पाणी कपात करण्याचे नियोजन आहे.
त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात २८ एप्रिलपासून सात विभागात आठवड्यातून एक दिवस संध्यकाळी पाणी बंद राहणार आहे. दिघा विभागात एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा होत असल्याने तेथील पाणीपुरवठा एमआयडीसीच्या शट डाऊननुसार बंद राहणार असल्याची माहिती शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली आहे.
विभागवार पाणीपुरवठा बंद
सोमवार-बेलापूर, मंगळवार-कोपरखैरणे, बुधवार-घणसोली, गुरुवार-वाशी, शुक्रवार-ऐरोली, शनिवार-नेरूळ, रविवार-तुर्भे
दिघा विभागामध्ये एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो, त्यामुळे एमआयडीसीच्या शटडाऊननुसार दिघा विभागात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.