तीन वर्षांनी ठामपा गजबजणार; आज महापौर विराजमान होणार

मुख्यमंत्री उपस्थित राहणार

ठाणे: ठाणे महापालिकेतील प्रशासकीय राजवट तब्बल तीन वर्षांनी म्हणजे उद्यापासून संपुष्टात येणार असून महापौरपदी शर्मिला गायकवाड-पिंपोळकर या विराजमान होणार आहेत.

महापालिकेत मार्च २०२२पासून प्रशासकीय राजवट सुरु होती. या काळात तीन आयुक्त बदली झाले आहेत. प्रशासकांनी त्यांच्या स्तरावर शहराच्या विकासासाठी निर्णय घेतले होते. शहराचे सुशोभीकरण करताना शहरातील चौक, रस्ते, उड्डाणपुल यांची रंगरंगोटी करण्यात आली होती. त्याचबरोबर पूर्व भागातील सॅटीसचे काम देखिल प्रशासकीय राजवटीमध्ये सुरु करण्यात आले होते. प्रशासकांनी विविध विषयांबाबत निर्णय घेतले होते. तीन महिन्यांपूर्वी ५०६ कोटींचे बिनव्याजी कर्ज घेण्याची प्रक्रिया सुरु करून विविध कामांचे कार्यादेश देखिल देण्यात आले होते. नगरविकास विभागामार्फत सुमारे ६२८ कोटींचा विशेष निधी महापालिकेला देण्यात आला होता, त्यामुळे शहरातील रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात आले होते.

मागिल महिन्यात महापालिकेच्या निवडणुका झाल्या. उद्या महापौरपदी शिंदे गटाच्या शर्मिला गायकवाड विराजमान होणार असून उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील यांची निवड होणार आहे. त्यामुळे उद्यापासून खऱ्या अर्थाने महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट सुरु होणार आहे. नागरिकांच्या प्रश्नावर प्रशासन आणि अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधी धारेवर धरताना दिसणार आहेत.

महापालिका मुख्यालय नटले
लवकरच महापौर विराजमान होऊन महापालिका मुख्यालयात नगरसेवकांचा वावर सुरू होणार असल्याने प्रशासनाने मुख्यालयात आवश्यक डागडुजी या आधीच पूर्ण केली असून मुख्यालय इमारत स्वच्छता करून ते चकाचक केले आहे. मुख्यालयाबाहेर व्यासपीठ बांधण्यात आले असून मुख्यालय फुलांनी सजवण्यात आले आहे. मुख्यालय आवार ते दुसर्‍या मजल्यावरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहापर्यंत रेडकार्पेट अंथरण्यात आला आहे.