भाईंदर: काशीमिरा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणाची तपासणी करुन दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या मोबाईल चोरट्यांना अटक करुन प्रत्येकाकडून बारा मोबाईल मिळून एकूण २४ मोबाईल जप्त केले आहेत. हे मोबाईल एक लाखांहून अधिक किंमतीचे असल्याचे पोलीस निरीक्षक संदीप कदम यांनी सांगितले.
काशिमीरा गुन्हे शाखेने मोबाईल चोरीच्या दोन घटना उघड करून दोन मोबाईल चोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचे एकूण २४ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. अनिल प्रजापती (29) रा. मीरा रोड, काशिगाव यांनी काशिमीरा पोलिसात तक्रार दिली होती की, त्यांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल घरात चार्जिंगला असताना खिडकीतून कोणीतरी चोरून नेला. अशाच आणखी एका घटनेत मनोहर शिवराम काजरेकर यांनी फाउंटन सिग्नलजवळील बसस्थानकावरून बस पकडत असताना त्यांच्या खिशातील काळ्या रंगाचा रेडमी नोट कंपनीचा मोबाइल कोणीतरी चोरून नेल्याची तक्रार पोलिसांत दिली होती.
खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दहिसर येथील रहिवासी अतिश सिंग आणि राबोडी, ठाणे येथील जुबेर जफर कच्छी यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तक्रारदारांच्या मोबाईलसह एकूण २४ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये 46,500 आणि 59,000 रुपये किमतीच्या मोबाईलचाही समावेश आहे. एकूण दीड लाख रुपये किमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले.