बुरखा घालून स्कूल व्हॅनसह आले; सराईत गुन्हेगाराला उचलून नेले

इराणी वस्तीत पोलिसांचा नाट्यमय थरार

कल्याण: अंधेरी येथे पोलीस असल्याचा बहाणा करून एक लाखाची लूट करणाऱ्या सराईत इराणी गुन्हेगाराच्या डी.एन.नगर पोलिसांनी आंबिवली येथे चित्रपटाला शोभेल असा सापळा रचून मुसक्या आवळल्या. यावेळी त्यांनी संशय येऊ नये म्हणून स्कूल व्हॅन वापरली तसेच एका अधिकाऱ्याने चक्क बुरखा घालून वस्तीत प्रवेश केला.

अंधेरी पश्चिम येथील एचडीएफसी बँकेजवळ तीन भामट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून एका तरुणाचे एक लाख रुपये घेऊन पोबारा केला होता. १० ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. याबाबतची तक्रार डी. एन. नगर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. परिसरातील सी सी टिव्ही फुटेज तपासले असता त्यात फिर्यादीची फसवणुक करणारा इसम हा विविध पोलीस आयुक्तालयात गुन्हे दाखल असलेला आणि आंबिवली येथील इराणी वस्तीत राहणारा फिरोज खान असल्याचे निष्पन्न झाले.

डी.एन.नगर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक राकेश पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार फिरोज खान आंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात येणार होता. पोलिसांचे पथक आज ३० ऑगस्ट रोजी आंबिवलीत पोहोचले. आंबिवलीत इराणी वस्तीमध्ये पोलिसांना मारहाणीच्या अनेक घटना घडल्या असल्याने यावेळी मुंबई पोलिसांनी काळजी घेतली. त्यांनी जीप ऐवजी शाळेची व्हॅन वापरली. त्यामुळे वस्तीत कुणालाच संशय आला नाही. बुरखा परिधान करून राकेश पवार वस्तीत शिरले. तर इतर पोलीस हे सध्या वेशात आजूबाजूला वावरत होते. शोध घेत असता फिरोज खान हा आरोपी एका सलूनमध्ये दाढी करत असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी क्षणार्धात त्याच्यावर झडप घालून त्याला पकडले आणि खेचतच रस्त्यावर उभ्या केलेल्या व्हॅनमध्ये कोंबले. परिस्थिती लक्षात येताच फिरोज खानच्या नातेवाईकांनी पोलिसांवर दगडफेक केली. यात एकजण किरकोळ जखमी झाला. फिरोज खान याला डी. एन. नगर पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केली असता अंधेरीतील गुन्ह्यात सहभाग असल्याचे कबूल केले. खान याच्या विरुद्ध अनेक पोलीस ठाण्यात सुमारे ३५ गुन्हे दाखल असल्याचे कळते.