मेट्रोमुळे ठाणे-नवी मुंबई प्रवास काही मिनिटांत

ठाणे: मेट्रो मार्ग १२ ही कल्याण-तळोजा मार्गिका, मेट्रो मार्ग ५ ठाणे-भिवंडी-कल्याण या मार्गिकेसोबत जोडली जाणार आहे. यामुळे ठाणे ते नवी मुंबई प्रवास देखील काही मिनिटांत शक्य होणार आहे.

याशिवाय मेट्रो मार्ग १४ (कांजूरमार्ग ते बदलापूर) साठी सल्लागाराने मसुदा अंतिम अहवाल एमएमआरडीएकडे सादर केला आहे. या कॉरिडॉरचा सविस्तर प्रकल्प अहवाल आयआयटी मुंबईकडे पिअर रिव्ह्यूसाठी पाठवण्यात आला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्राधिकरणाच्या प्रशासकीय मान्यतेने घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल तसेच अगोदर २०.७ किमी लांबीच्या प्रस्तावित असलेल्या मेट्रो मार्ग १२ च्या संरेखनाचा विस्तार करुन ती नवी मुंबई मेट्रोसोबत जोडण्यासाठीचा आवश्य तो अभ्यास सध्या सुरू आहे. त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.

मेट्रो प्रकल्पांसाठी दोन्ही जमिनी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याबद्दल आम्ही आभारी आहोत. सध्या सर्वच मेट्रो प्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. ही कामे लवकरच पूर्ण होतील. मेट्रो डेपो हे मेट्रो प्रकल्पांच्या उभारणीतील अविभाज्य घटक आहे. जो प्रकल्प पूर्ण होऊन त्याचे सुव्यवस्थित संचलन करणे, गाड्यांची देखभाल दुरूस्ती याकरीता अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यासह राज्य शासनाच्या मदतीने उर्वरित प्रस्तावित असलेल्या सर्व मेट्रो डेपोसाठीच्या जागा हस्तांतरित करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले.

मेट्रो मार्ग १२ च्या विस्ताराबाबत आम्ही अभ्यास करत असून तिचे नवी मुंबई मेट्रोच्या मेट्रो स्थानकासोबत एकत्रीकरण करण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती डॉ. मुखर्जी यांनी दिली.