ठाण्यात अजित पवार यांनी आव्हाडांवर टीका टाळली

राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुटू

ठाणे : ठाण्यातील राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नवीन पक्ष कार्यालयाच्या उदघाटनास आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका टाळल्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात नजीब मुल्ला यांना उमेदवारी देणार का? या प्रश्नावर पवार यांनी सध्या आम्ही लोकसभेवर लक्ष केंद्रित केले असल्याचे सांगत आव्हाडांचा उल्लेख टाळला, त्यामुळे आव्हाड आणि अजित पवार यांचे मनोमिलन झाले आहे का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ठाण्यातून आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर सर्मथक मानले जाणारे माजी खासदार आनंद परांजपे तसेच माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी अजित पवार यांना साथ दिली आहे. या सर्व घडामोडीनंतर अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचा ठाण्याचा पठ्या असा उल्लेख करत आव्हाडांमुळे राष्ट्रवादीमधील अनेक नेते कसे पक्ष सोडून गेले याचा पाढाच वाचला. राष्ट्रवादीमधील फुटीनंतर दोन गट पडले असून खरी राष्ट्रवादी आमचीच, असा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे. त्यामुळे ठाण्यातील कार्यालय कोणाचे यावरून वादंग निर्माण झाला होता. मात्र माजी खासदार आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी जुन्या कार्यालयावर ताबा न सांगता नवीन प्रशस्त कार्यालय घेऊन आव्हाडांना धक्का देण्याचे काम केले आहे.

या नवीन कार्यालयाचे उदघाटन स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले असून यादरम्यान ते आव्हाडांवर टीका करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही. विशेष म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीत जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात नजीब मुल्ला यांना उमेदवारी देणार का या प्रश्नावर मात्र आव्हाडांचा उल्लेख टाळत अजित पवार यांनी या प्रश्नानालाच बगल दिली. आधी लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगून पवार यांनी ठाण्यात येऊनही आव्हाडांवर टीका टाळली असल्याने यामागे काही राजकारण शिजतंय का? अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांचे मनोमिलन झाले आहे का? अशी उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

अजित पवार यांनी आव्हाडांवर टीका टाळली असली तरी दुसरीकडे राष्ट्रवादीचे सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी मात्र आव्हाडांचे नाव न घेता पक्ष चुकीच्या माणसाच्या हातात गेला होता अशी जाहीर टीका केली आहे. मात्र ठाण्यात आता पक्ष खऱ्या अर्थाने वाढेल असे त्यांनी सांगितले. तर आव्हाडांनी हा कार्यक्रम झाल्यानंतर एक ट्विट केले असून यामध्ये त्यांनी अजित पवार यांच्या भूमिकेविषयी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये अजित पवार यांचे आभार मानले. दादा आभार, या दोन शब्दांची जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. या सर्व घडामोडींनंतर मात्र अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत.