दुचाकी वाहनचालक आणि नागरिकांची कोंडी
ठाणे : नौपाडा येथील गावदेवी भाजी मंडई इमारतीच्या तळघरातील वाहनतळ मागील तीन वर्षे बंद अवस्थेत असल्याने ठाणेकरांना रस्त्यावर गाड्या उभ्या कराव्या लागत आहेत. परिणामी नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
कोरोना काळात जागे भाडे दरात झालेली वाढ परवडत नसल्यामुळे गावदेवी भाजी मंडई येथील संबंधित ठेकेदाराने दोन वर्षांपुर्वी काम बंद केले असून तेव्हापासून २५० ते ३०० दुचाकींच्या पार्किंग क्षमतेचे हे वाहनतळ बंदच आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. अनेक प्रवासी घर ते स्थानक या वाहतूकीसाठी दुचाकीचा वापर करतात. या भागात वाहनतळाची पुरेशी सुविधा नव्हती. यामुळे नागरिक रस्त्याकडेला दुचाकी उभी करतात. या बेकायदा पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडीची समस्या निर्माण होत होती. ही कोंडी सोडविण्यासाठी पालिकेने गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. गावदेवी मैदानात पालिकेने स्मार्ट सिटी योजनेतून भूमिगत वाहनतळ उभारून त्याचे लोकार्पण केले. याठिकाणी १३० चारचाकी वाहने तर १२० दुचाकी वाहने उभी करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
या वाहनतळाआधी पालिकेने त्याशेजारीच असलेल्या गावदेवी भाजी मंडई इमारतीच्या तळघरात दुचाकी वाहनतळाची उभारणी केली. २५० ते ३०० दुचाकींच्या पार्किंग क्षमतेचे हे वाहनतळ आहे. या ठिकाणी ठेकेदाराची नेमणूक करून ते नागरिकांसाठी खुले करण्यात आले होते. परंतु दरवर्षी जागे भाडे दरात दहा टक्के वाढ केली जात होती. ही दरवाढ परवडत नसल्यामुळे संबंधित ठेकेदाराने २०२० मध्ये वाहनतळाचे काम बंद केले. त्यानंतर दोन महिन्यात कोरोनाचा काळ सुरु झाला. तेव्हापासून हे वाहनतळ बंद अवस्थेत आहे.
या ठेकेदाराचा ठेका रद्द करून त्या ठिकाणी नवीन ठेकेदार नियुक्त करण्यासंबंधी पालिका प्रशासनाने तयार केलेल्या प्रस्तावास सर्व साधारण सभेने मान्यताही दिली होती. तरीही वाहनतळ अद्याप सुरु होऊ शकलेले नाही. महापालिकेच्या कासवगतीच्या कारभारामुळे नागरिक रस्त्यावर दुचाकी उभी करत असल्याने ठाणे स्थानक परिसरात वाहतूक कोंडीची समस्या होऊ लागल्याचे चित्र आहे. त्याचा मनस्ताप सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. रस्त्यावर उभी केलेली दुचाकी वाहतूक पोलीस उचलून घेऊन जातात. त्याचा भरमसाठ दंड ठाणेकरांना द्यावा लागत असल्याने हे वाहनतळ लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे.