कासारवडवलीतील शासकीय भूखंडावरील ४० बांधकामे तोडली

  • *जिल्हा प्रशासनाची कारवाई
    *महापालिका प्रशासन सुस्त

    ठाणे: कासारवडवलीमधील ट्रॉपिकल लगून परिसरात शासकीय भूखंडावर बेकायदेशीरपणे बांधलेल्या ४० घरांवर आज बुलडोझर चालवून ती जमीनदोस्त करण्यात आली. जिल्हा प्रशासन आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली.

एकीकडे माजिवडे-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत जागा मिळेल तेथे उभ्या राहिलेल्या अनधिकृत इमारती, चाळी आणि गाळे यांच्यावर कारवाई करण्याबाबत प्रभाग समिती बोटचेपे धोरण स्वीकारत आहे तर दुसरीकडे शासकीय भूखंडावरील अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या बांधकामांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क असल्याचे दृश्य आज दिसले.

कासारवडवली येथील सहसकिय जागेत ४० घरे अनधिकृतपणे बांधण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाने अखेर पुढाकार घेत महापालिकेच्या मदतीने आज मोठी कारवाई करत ही बांधकामे जमीनदोस्त केली. तहसिलदार दिनेश पैठणकर यांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. भूमाफियांनी तहसिलदार दिनेश पैठणकर यांच्याशी वाद घालून कारवाईत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु पैठणकर यांनी माघार न घेता कारवाई पूर्ण केली. प्रभाग हद्दीत शेकडो बांधकामे बेकायदेशीरपणे होत असताना प्रभाग कार्यालय प्रशासन सुस्त असल्याचे दिसत आहे. तर जिल्हा प्रशासनाच्या कारवाईचे कौतुक होत आहे.