शहापूरमधील २७ गावे आणि १२४ पाड्यांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा

ठाणे: शहापूर तालुक्यातील २७ गावे १२४ पाड्यांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसत असून त्यांना मागील काही आठवड्यांपासून नियमित पद्धतीने ३० टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. शहापूरबरोबरच मुरबाड तालुक्यातील सहा गावांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून त्यांना दररोज चार टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड या दोन तालुक्यांमध्ये उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवते. जिल्ह्यात वस्ती असलेल्या गावांची संख्या ही ८०७ इतकी आहे. या गावांमध्ये एकूण १९७५ इतके वाड्या आहेत. यातील ५२३ गावे आणि १४६१ पाड्यांना योग्य स्वरूपात पाणी मिळते. मात्र उर्वरित गावांमध्ये आणि पाड्यांमध्ये कायम तीव्र पाणीटंचाई जाणवत असते. यामध्ये शहापूर तालुक्यातील गावांची आणि पाड्यांची संख्या अधिक आहे.

या दोन्ही तालुक्यातील काही गावांना जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो. यामुळे या गावांची पाण्याची समस्या काही अंशी कमी जाणवत आहे. उर्वरित गावांना प्रशासनाकडून नळजोडणी, कुपनलिका, विहिरी, तलाव यांसारख्या योजनांद्वारे मिळणाऱ्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे.

मात्र या योजना गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थितीत असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तसेच यंदा उन्हाळा तीव्र असल्याने विहीर आणि तलाव आटण्याचे प्रमाणही वाढले आहे. याचा सर्वाधिक फटका हा शहापूर तालुक्यातील १२४ पाड्यांना बसत आहे. तर मुरबाड तालुक्यातील सहा गावांनाही तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे सद्यपरिस्थितीत या सर्व गावांची भिस्त ही टँकरवरच असल्याचे दिसून येत आहे.