ठाणे : मुंबईसह ठाणे जिल्ह्याचे आद्य रहिवासी असलेल्या कोळी बांधवांनी आणि नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने कळवा खाडी आणि चेंदणी बंदरात श्रीफळ अर्पण करत नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला.
ठाणे पूर्व भागात चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट आणि चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंचच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात कोळीवाड्यातील तिघा नवदाम्पत्याने विधिवत पूजा करत दर्याला नारळ अर्पण करत सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी आवाहन केले.
नारळीपौर्णिमेचे औचित्य साधून चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट आणि चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंचच्या वतीने पूर्व-पश्चिम कोळीवाड्यातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. पूर्व भागातील विठ्ठल मंदिरात कौत्यय आणि रेश्मा कोळी, कुणाल आणि माधवी कोळी, सम्राट आणि तन्वी कोळी या नवदाम्पत्याच्या हस्ते श्रीफळाची पूजा करण्यात आली. त्यानंतर पश्चिम कोळीवाड्यातील दत्तमंदिरातून ही मिरवणूक वाजत गाजत पूर्व भागातील चेंदणी बंदर येथे आली. त्याठिकाणी दर्याला शांत होण्याचे आवाहन करत त्याला मानाचा नारळ अर्पण करण्यात आला.
कळवा खाडी पुलावरही हजारो ठाणेकर विशेषत: कोळी बांधवांनी हजेरी लावत समुद्राला श्रीफळ अर्पण करून प्रार्थना केली. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.