भाजपच्या कार्यकारणीत ७० टक्के नवे चेहरे

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकारणीत मोठे फेरबदल

ठाणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा भाजप कार्यकारणीत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. नवीन कार्यकारणीत ३० टक्के अनुभवी आणि जुने चेहरे ठेवण्यात आले असून जवळपास ७० टक्के नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

नवीन कार्यकारिणीत चार सरचिटणीस, उपाध्यक्ष, चिटणीस, मोर्चा अध्यक्ष, प्रकोष्ट सेल संयोजक आणि कार्यकारिणी सदस्यांचा समावेश आहे. अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्षपदी विरसिंह पारछा यांना कायम ठेवण्यात आले आहे. तर, महिला मोर्चा, युवा मोर्चा, ओबीसी मोर्चा, अनुसुचित जमाती मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा आणि भटके-विमुक्त संयोजक या पदांच्या नेतृत्वात बदल करण्यात आला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या अधिक जागा निवडून येतील या दृष्टीने आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्याच्या नव्या कार्यकारणीसंदर्भात प्रदेश पातळीवरूनच आदेश देण्यात आले असून त्यादृष्टीने ही नवी कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.

जिल्हा सरचिटणीसपदी मनोहर सुगदरे, सचिन पाटील, विलास साठे, डॉ. समीरा भारती, उपाध्यक्षपदी जयेंद्र कोळी, डॉ. राजेश मढवी, विक्रम भोईर, राजेश गाडे, सागर भदे, रमेश आंब्रे, महेश कदम, विद्या शिंदे, वर्षा पाटील, श्रुती महाजन, हर्षराज नारंग तर चिटणीसपदी गौरव सिंह, राजेश सावंत, संतोष साळुंखे, विजय भोईर, किशोर गुणीजन, रामकिसन जैस्वार, तृप्ती जोशी-पाटील, श्रुतिका कोळी-मोरेकर, माधुरी मेटांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

खजिनदारपदी सुदेश खारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जुन्या कार्यकारणीत माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांच्याकडे ठाणे महिला मोर्चा अध्यक्षपद होते. परंतु त्यांच्या जागी आता माजी नगरसेविका स्नेहा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जुन्या कार्यकारणीत सारंग मेढेकर यांच्याकडे युवा मोर्चा अध्यक्ष होते, त्यांच्या जागी सुरज दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्षपदी विरसिंह पारछा यांना कायम ठेवण्यात आले आहे. जुन्या कार्यकारणीत सचिन केदारी यांच्याकडे ओबीसी मोर्चा अध्यक्षपद होते, त्यांच्या जागी सुरेश पाटील यांची तर, अनुसुचित जमाती मोर्चा अध्यक्षपदी नताशा निशांत, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्षपदी शरिफ शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.