- ठाणे: राज्यात महागाई आणि महिला, लहान मुलींवरील अत्याचार याचे प्रमाण वाढीस लागले आहे, असा आरोप करीत महिलाध्यक्षा रोहिणी खडसे, डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार तथा जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ठाण्यात निदर्शने करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. लहान मुलांचे लैंगिक शोषण होत आहे. मात्र, एकाचे एन्काऊंटर करून इतर गुन्हेगार कसे वाचतील, याची दक्षता घेतली जात आहे, असा आरोप करत ठाणे महिलाध्यक्ष सुजाता घाग, महिला कार्याध्यक्ष सुरेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी महिलांच्या हातात सरकारचा निषेध करणारे फलक होते. तसेच महिलांनी, “या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, लाडकी बहिणीचे पैसे नको, बहिणीला सुरक्षा द्या” , अशा घोषणा दिल्या.
या आंदोलनात युवक अध्यक्ष विक्रम खामकर , विद्यार्थी सेलचे अध्यक्ष प्रफुल कांबळे, हॉकर सेलचे अध्यक्ष सचिन पंधरे, महाराष्ट्र प्रदेश सदस्या शशी पुजारी, पूजा उदासी, माधुरी सोनार, राणी देसाई, मनिषा करलाद विधानसभा अध्यक्षा फुलबानो पटेल , साबिया मेमन, ब्लॉक अध्यक्षा ज्योती निम्बर्गी आदी महिला पदाधिकारी मोठ्या संख्यांनी सहभागी झाले होते.