ठाण्यातील दोघे ताब्यात
कसारा: ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत कसारा पोलीस स्टेशन हद्दीत एका टोयोटा इनोव्हा कार (एमएच ११ बी व्ही ९७०८) मध्ये तपासणी अधिका-यांना दोन कोटींची रक्कम आज सकाळी मिळून आल्याने खळबळ माजली आहे.
शहापूर विधानसभा मतदारसंघातील स्थिर सर्वेक्षण पथक क्रमांक 4 चे प्रमुख संदीप पवार (कृषि सहायक, तालुका कृषि कार्यालय) आणि त्यांचे पथक विधानसभा निवडणूक-2024 च्या अनुषंगाने कसारा हद्दीत वाहने तपासणी करीत असताना त्यांना बुधवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास एका मरून कलरच्या इनोव्हा कारमध्ये दोन कापडी आणि दोन प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये रोकड आढळून आली. चालक मयूर कदम (34 ), रा.कोपरी पूर्व, ठाणे आणि त्याचा सहकारी सूर्यकांत शिंदे (41) रा.सावरकर नगर, ठाणे यांची रोकडबाबत चौकशी केली असता त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत.
त्यांच्याकडे 500 रुपयांच्या 40 हजार चलनी नोटा मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस निरिक्षक सुनील बच्छाव करीत आहेत.