शहापूर-मुरबाड टँकरमुक्तीच्या दिशेने जिल्हा परिषदेचे पाऊल

शिवजल सुराज्य अभियानाचे सीईओंच्या हस्ते शुभारंभ

ठाणे: ठाणे ग्रामीण भागातील पाणी समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत “शिवजल सुराज्य अभियान” राबविण्यात येत असून या अभियानाचे शुभारंभ आज २६ डिसेंबर, २०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते शहापूर तालुक्यातील आटगांव येथे करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आटगांव केंद्र साखरोली येथे पाऊस पाणी संकलन (रेन वॉटर हार्वेस्टिंग) कामाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते झाले.‌

सीसीटी, डीप सीसीटी, पाऊस पाणी संकलन (रेन वॉटर हार्वेस्टिंग), वनराई बंधारे, ग्रामपंचायत अंतर्गत खाजगी विंधन विहीर पाहणी करून लोकसहभागातून रेन वॉटर हार्वेस्टिंग कामे करण्यात यावी तसेच गाव शिवार फेरी करून गावातील भूजल पातळी वाढ होऊन गावात पिण्याचे मुबलक पाणी मिळण्यासाठी वर्षभरात नियोजन करावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावेळी दिले. यावेळी लघुपाट बंधारे विभागाचे विभाग प्रमुख दिलीप जोकार तसेच ग्रामस्थ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आटगांव शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुरबाड व शहापूर तालुक्यातील टँकर ग्रस्त गावात ८५ तर इतर सर्व तालुक्यात १,५१५ वनराई बंधारे बांधण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतले असून आज, शहापूर तालुक्यात ११० वनराई बंधारे, जल तारा सात, भातखाचर १३, बांधबंदिस्तीची सात काम करण्यात आली आहेत. कल्याण तालुक्यात ४७ वनराई बंधारे, भिंवडी तालुक्यात २१ वनराई बंधारे, मुरबाड तालुक्यात १४ वनराई बंधारे, अंबरनाथ तालुक्यात ११ वनराई बंधारे असे एकूण २०३ वनराई बंधारे तयार करण्यात आले.

या अभियानासाठी पुर्न:भरणाचे उद्दीष्ट व पाणी साठवण करण्यासाठी शहापूर तालुक्यात वनराई बंधारे/कच्चे बंधाऱ्यांची ५० नियोजित कामे असून त्याद्वारे ५० दशलक्ष लिटर पाणी साठवण करून ते उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कामे सुरू करण्यात आली आहेत. तर मुरबाड तालुक्यात वनराई बंधारे/कच्चे बंधाऱ्यांची ३५ नियोजित कामे असून त्याद्वारे ३५ दशलक्ष लिटर पाणी साठवण करून ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शहापूर व मुरबाड तालुक्यातील टँकरग्रस्त गाव व्यतिरिक्त अंबरनाथ तालुका १००, कल्याण तालुका १००, भिवंडी तालुका ४५०, मुरबाड तालुका ४१५, शहापूर तालुका ४५० असे एकूण १५१५ वनराई बंधारे/कच्चे बंधाऱ्यांच्या उद्देशाने काम सुरू करण्यात आले आहे.

कच्चे बंधारे/ वनराई बंधारे, साखळी सिमेंट बंधारे (नाला गाळ काढणे), के.टी.वेअर/ साठवण बंधारा दुरुस्ती/ नवीन कामे, पाझर तलाव/ गावतलाव दुरुस्ती/ गाळ काढणे/ नवीन कामे, खोल सलग समतळचर/ सलग समातरचर, पिण्यांच्या पाण्याची विहीर गाळ काढणे / दुरुस्ती, जलकुंभ गाळ काढणे/नवीन बुडक्या, विंधण विहिरीव्दारे छतावरील पाऊस पाणी संकलन, रिचार्ज शाफ्ट (नळयोजना विहीर स्रोत बळकटी करणासाठी), गॅबीयन बंधारे इ. सर्व उपाययोजना ‘शिवजल सुराज्य अभियान’ अंतर्गत राबवण्यात येणार आहेत. या सर्व कामांना नियोजित वेळेत पुर्ण करण्यासाठी श्रमदान, पाण्याचे सुयोग्य नियोजन करून गावातील पाणी पातळी वाढवण्यासाठी वनराई पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी सामाजिक संघटना, शासकीय अधिकारी, कर्मचारी संघटना, जिल्ह्यात काम करणाऱ्या अशासकीय संस्था तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येत आहे.