मुंबई : राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमधील नाराजीच्या चर्चा रंगत असताना आता शिंदेंच्या नेत्यांची सुरक्षा कपात केल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. मात्र आता त्यात कपात केल्यानं शिवसेना नेत्यांनी संताप व्यक्त केला. शिवसेना नेत्यांसोबतच भाजप आणि राष्ट्रवादीतील काही नेत्यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे. ज्या नेत्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही अशा शिवसेनेच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पण त्यामुळे आता शिंदे आणि फडणवीस यांच्यातील नाराजीचा नवा अंक सुरू होण्याची शक्यता आहे.
राज्यातील व्हीआयपी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला असून ज्या नेत्यांच्या जीवाला धोका नाही त्यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये भाजप, राष्ट्रवादीसह शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचा समावेश आहे. भाजप नेते रवींद्र चव्हाण, प्रताप चिखलीकर यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
या सुरक्षा कपातीचा सर्वाधिक फटका बसणार आहे तो म्हणजे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना. या आधी शिंदेंच्या आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येत होती. त्यामध्ये या आमदारांच्या पुढे-मागे पोलिसांच्या गाड्या असायच्या. तसेच या आमदारांच्या घराबाहेरही पोलिस सुरक्षा तैनात असायची.
ही सर्व सुरक्षा आता कमी करण्यात आली आहे. त्यामुळे नव्या नियमानुसार, शिंदेंच्या आमदारांच्या मागे पुढे असणाऱ्या पोलिस गाड्या कमी करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्या घराबाहेरील पोलिसही कमी करण्यात येणार आहेत.
नव्या नियमानुसार, शिंदेंच्या आमदारांसोबत आता एकच सुरक्षा रक्षक असणार आहे. त्यामुळे शिंदेंच्या आमदारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या आधी सरकारी सुरक्षेचा लवाजमा घेऊन फिरणाऱ्या आमदारांना आता केवळ एका रक्षकासह फिरावं लागणार असल्याने गृहखात्याच्या या निर्णयावर नाराजीही व्यक्त करण्यात येत आहे.
शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर त्यांनी शिवसेना आमदारांच्या सुरक्षेत वाढ केली. शिंदेंसोबत आलेल्या आमदारांना त्यावेळी वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली. यावरून अनेकदा सरकारवर आक्षेप घेण्यात आले होते. पण अडीच वर्षांच्या काळात ती सुरक्षा कायम ठेवण्यात आली होती. आता देवेंद्र फडणवीसांनी त्यामध्ये कपात केली आहे.