टायगर अभी जिंदा है..! सचिन तेंडुलकरचा विराट कोहलीला दणका

भारताच्या महान फलंदाजांपैकी एक असलेला सचिन तेंडुलकर जगातील सर्वाधिक पसंतीच्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. मँचेस्टर युनायटेड आणि पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो पहिल्या स्थानावर आहेत. त्याच वेळी, दुसऱ्या स्थानावर पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) आणि अर्जेंटिनाचा स्टार स्ट्रायकर लिओनेल मेस्सी आहे. जगातील सर्वाधिक पसंतीच्या पुरुषांच्या यादीत सचिन १२व्या क्रमांकावर आहे, तर खेळाडूंमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर या यादीत रोनाल्डो चौथ्या तर मेस्सी सातव्या क्रमांकावर आहे. इंटरनेट आधारित मार्केट रिसर्च आणि डेटा अॅनालिसिस फर्म YouGov ने हे सर्वेक्षण केले आहे. या वर्षीच्या सर्वेक्षणात ३८ देश आणि प्रदेशातील ४२ हजार लोकांचा समावेश करण्यात आला होता.

पुरुषांच्या यादीत सचिन तेंडुलकर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा पुढे आहे. त्याचवेळी सचिनने विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीलाही मागे टाकले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सर्वाधिक पसंतीच्या पुरुषांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. बिल गेट्स दुसऱ्या तर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वाधिक प्रशंसनीय व्यक्तींच्या या यादीत आठव्या क्रमांकावर आहेत.

शाहरुख खान १४व्या तर अमिताभ बच्चन (१५व्या) स्थानावर आहेत. विराट कोहली १८ व्या क्रमांकावर आहे. खेळाडूंच्या यादीत कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. महिलांमध्ये बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा पहिल्या, हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली दुसऱ्या आणि क्वीन एलिझाबेथ द्वितीय तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारतीय महिलांमध्ये प्रियांका चोप्रा, ऐश्वर्या राय बच्चन आणि सुधा मूर्ती यांचा या यादीत समावेश आहे. प्रियांका १०व्या, ऐश्वर्या १३व्या आणि सुधा मूर्ती १४व्या स्थानावर आहेत. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांना २०वे स्थान मिळाले आहे. सचिन तेंडुलकर १० वर्षांहून अधिक काळ युनिसेफशी संबंधित आहे. २०१३ मध्ये त्यांना दक्षिण आशियाई राजदूत म्हणूनही नियुक्त करण्यात आले होते. सचिनने गेल्या काही वर्षांत आरोग्य, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात अनेक राज्यांत भरीव काम केले आहे.