महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : भारतीय महिलांची पाकिस्तानशी सलामी

पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या महिलांच्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची ६ मार्च रोजी सलामीच्या लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी गाठ पडणार आहे.

यजमान न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्याद्वारे ४ मार्चपासून विश्वचषकाला प्रारंभ होईल. आठ संघांचा समावेश असलेली ही स्पर्धा साखळी फेरीच्या (राऊंड-रॉबिन) पद्धतीनुसार खेळवण्यात येणार आहे. आघाडीचे चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. ३ एप्रिल रोजी ख्राइस्टचर्च येथे अंतिम सामना होईल.

विश्वचषकाला प्रारंभ होण्यापूर्वी भारतीय महिला संघ न्यूझीलंड दौऱ्यावर मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे. विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या लढतीनंतर भारतीय संघ अनुक्रमे न्यूझीलंड (१० मार्च), वेस्ट इंडिज (११ मार्च), इंग्लंड (१६ मार्च), ऑस्ट्रेलिया (१९ मार्च), बांगलादेश (२२ मार्च) आणि दक्षिण आफ्रिका (२७ मार्च) यांच्याशी दोन हात करणार आहे.