विटावा रेल्वे पुलावरून महिलेची खाडीत उडी

ठाणे: विटावा रेल्वे पुलावरून एका २७ वर्षाच्या महिलेने खाडीत उडी घेतली. स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तिला बाहेर काढून कळवा येथील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले.

शुक्रवार २१ एप्रिल रोजी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार कविता राठोड असे महिलेचे नाव असून ती मुकुंद केणीबंगल्याजवळ, मोकळ्या मैदानाच्या जवळील झोपडपट्टीमध्ये राहते.

खाडीमध्ये उडी मारलेल्या महिलेला स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढून उपचाराकरिता छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, ठाणे येथे दाखल केले आहे. महिलेच्या छातीला आणि कंबरेला दुखापत झाली असल्याने रुग्णाचे एक्स-रे केल्यानंतर निदान करता येईल,असे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे.