कोपरी पुल खुला झाल्याने वाहनांची संख्या २० टक्क्यांनी वाढणार

दोन्ही पुलावर पादचा-यांसाठी पदपथ

ठाणे/भालचंद्र देव

ठाणे : मुंबई-ठाणे जिल्ह्याच्या कोपरी पूल सीमेवर दररोज वाहने लाखो चालकांची कोंडीपासून सुटका करण्यात आली असल्यामुळे असंख्य चालकांना दिलासा मिळाला आहे. पण हा नवीन पूल खुला झाल्यामुळे सर्व वाहनांची संख्या १५ ते २० टक्के वाढणार आहे, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिका-यांनी ‘ठाणेवैभव’ला  दिली.

या पुलाच्या कामांसाठी ‘एमएमआरडीए’ने २५८ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली असून, प्राधिकरणाने त्यातच सर्व कामे केली आहेत. त्यात रेल्वेचाही खर्च अंतर्भूत आहे. कामांच्या व्याप्तीनुसार खर्च करण्यात आला आहे. सर्व कामे अखेरच्या सहा महिन्यांत हातावेगळी करण्यात एमएमआरडीएला यश आले.

सर्व प्रकारचे जे चालक या पुलावरुन प्रवास करण्यास टाळत होते, ते आजपासून हा पूल खुला झाल्यामुळे नियमित प्रवास करणार असल्याने वाहनांच्या संख्येत सुमारे २० टक्के वाढ होण्याची दाट शक्यता संबंधित विभागांच्या अधिका-यांनी व्यक्त केली.

ठाण्याहून मुंबईकडे आणि मुंबईहून ठाण्याकडे जाणा-या पुलाच्या भिंतीलगत पादचा-यांसाठी दोन मीटरच्या पदपथाचे काम येत्या सोमवारपासून सुरु होणार आहे. हा पूल पादचारी पथ बांधण्यात येणार असला तरीही त्याचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. पदपथ उभारताना वाहतुकीची अडचण येणार नाही. हे काम महिनाभर ज्ञानसाधना महाविद्यालयापासून आनंदनगर आणि आनंदनगर ते ज्ञानसाधनापर्यंत दोन्ही बाजूंनी करण्यात येणार आहे. हे काम करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नसल्याचे वरिष्ठांकडून सांगण्यात आले. या संपूर्ण पुलाची मुख्य डागडुजी, दुरुस्ती केल्यानंतर उर्वरित कामे सहा महिन्यांत हातावेगळी करण्यात प्राधिकरणाच्या अधिका-यांना यश आले. त्यामुळे या पुलाची सर्व कामे सहा महिनेआधी पूर्ण झाल्याचेही वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.

ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळ एका नाल्याजवळ ठाणे महापालिकेचे महत्वाचे काम करण्यासाठी पालिकेला एक महिना लागणार आहे. या कामांची पूर्तता केव्हा होईल, याची प्राधिकरण वाट पाहात आहे. महापालिकेने त्यांचे काम हातावेगळे केल्यानंतर प्राधिकरणाच्या कामांना सुरुवात होईल व प्राधिकरणाची कामे दोन महिन्यांत, एप्रिलपर्यंत पूर्ण होतील, असा विश्वास प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिका-यांनी व्यक्त केला.

महापालिकेची कामे संंपल्यानंतर प्राधिकरण त्यांच्या अन्य कामांना वेग देण्यात येणार असून, त्याचा खर्च साधारणत: चार ते पाच कोटी रुपयांचा असेल. ज्ञानसाधनाहून हायवेकडे येणा-या रस्त्याचे काम प्राधिकरणाच्या संबंधित विभागाचे अधिका-यांकडून लवकरच सुरु होणार आहे. यासाठी ते महापालिकेच्या अधिका-यांशी संपर्कात आहेत.

हायवेवर याआधीही दिवाबत्ती लावली होती. रस्त्याच्या मधोमध (सेंटरला) आणखी २९ दिव्यांच्या खांबांची उभारणी केली असून, ती जास्त प्रकाशमान आहे.

हायवेच्या मध्यावर (डिव्हायडर) वेगवेगळ्या रंगांची (पॅचेस) फुलझाडे लावण्यात आली आहेत. प्रत्येकी ५०-५० मीटरवर लावल्यानंतर काही दिवसांतच ती फुलल्यानंतर हायवे आणखीन सुशोभित दिसणार आहेत.