ठाणे : देशाला विजयी करायचे असेल तर नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी पाठवण्याशिवाय पर्याय नाही असे सांगत जिल्ह्यातील तीनही लोकसभेच्या जागा जिंकण्याचा निर्धार ठाण्यातील महायुतीच्या मेळाव्यात करण्यात आला.
राम मंदिरावरून आता राजकारण सुरु आहे. मात्र ७० वर्षात यांना राम मंदिर का बांधता आले नाही, यासाठी मोदींनाच पुढाकार घ्यावा लागला. अशा शब्दात या मेळाव्यात विरोधकांवरही टीका करण्यात आली. महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जाण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार करत असून मोदींचे हात बळकट करण्याचे काम हे तीनही नेते करत असल्याचे सांगत या मेळाव्यात या तीनही नेत्यांच्या कामाचे कौतुक यावेळी करण्यात आले.
रविवारी ३६ जिल्ह्यांमध्ये महायुतीचे जिल्हास्तरीय मेळावे घेण्यात आले. ठाण्यातील महायुतीचा मेळावा हा शिवाजी मैदान या ठिकाणी घेण्यात आला. मंत्री रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार गणेश नाईक, प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, किसन कथोरे, मंदा म्हात्रे, गीता जैन, निरंजन डावखरे, प्रमोद हिंदुराव, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, संदीप नाईक, माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे तसेच महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले, “दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, या महाराष्ट्र गीतातील ओळी आपल्याला लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्षात आणायच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जनतेचा विश्वास आहे. किसान सन्मान, आयुष्मान भारतसारख्या अनेक सरकारी योजनांमधून जनतेचे जीवनमान बदलले. आतापर्यंत शेतकऱ्यांना दोन लाख ८५ हजार कोटी रुपये किसान सन्मानमधून दिले गेले. तर कॉंग्रेसने केवळ ४० हजार कोटींची शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन अनेक वर्ष कर्जमाफीचे तुणतुणे वाजविले. २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसल नसता, तर दहा वर्ष ते मुख्यमंत्री राहिले असते. आता विरोधी आघाडीला जागा दाखविण्याची वेळ आली आहे. त्यासाठी महायुतीच्या कार्यकर्तयांनी एकदिलाने कार्य करावे.”असे आवाहन त्यांनी केले. खासदार श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक करत ही निवडणूक लोकसभेपेक्षा जे देशाचे नेतृत्व करत आहेत, त्यांच्यासाठी महत्वाची असून अब कि बार ४०० पार असा नारा शिंदे यांनी यावेळी दिला. राम मंदिराच्या उभारणीचे काम जे ७० वर्षात विरोधकांना जमले नाही ते मोदी यांनी करून दाखवले. जिल्ह्यात महायुतीचे तीनही उमेदवार मोठ्या फरकाने निवडून देण्याचे आवाहनही शिंदे यांनी यावेळी केले.
येत्या एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीचे शिवधनुष्य कार्यकर्त्यांनी पेलावे, असे आवाहन मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षात झाली नाही, तेवढी कामे अवघ्या दीड वर्षात झाली. तर ७० वर्षांत न झालेल्या राम मंदिरासह सर्व प्रमुख कामे १० वर्षांत झाली आहेत, अशा शब्दांत खासदार श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजवटीचे कौतुक केले. तर शिवसेनेचे प्रदेश प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. देवेंद्र फडणवीस हे शब्दाला जागणारे नेते असून मुंबईची सत्ता म्हणजेच मुंबई महापालिका केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द टाकला म्हणून उद्धव ठाकरे यांना दिली असा आरोप नरेश म्हस्के यांनी यावेळी केला. देशातील मोठे सत्तांतर एकनाथ शिंदे यांनीच केले असल्याचे त्यांनी सांगितले. तर मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या कामांचे कौतुक करत पुढील काळात सर्वांनी नमो सैनिक व्हावे, असे आवाहन म्हस्के यांनी केले.
ठाणे जिल्ह्यातील वातावरण राममय करून महायुतीने लोकसभेच्या तिन्ही जागा जिंकाव्यात, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केले. तर भविष्यात ठाणे जिल्ह्याला सुगीचे दिवस येणार असून, मुरबाड रेल्वे, भाई कोतवाल व हिराजी पाटील यांचे स्मारक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला प्राधान्य देण्याची विनंती प्रमोद हिंदुराव यांनी केली. या मेळाव्यात उपस्थित असलेल्या महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी राम प्रतिज्ञा दिली.