ठाणे : ठाणे जिल्ह्यात भाजपचे नऊ तर शिवसेना शिंदे गटाचे सहा आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भाजपालाच मिळावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गट यांच्यात या पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.
आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढवून त्या ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाबरोबरच भाजपनेही कंबर कसली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात भाजपाचा स्ट्राईक रेट १०० टक्के असून त्यांचे नऊ आमदार निवडून आले आहेत तर शिंदे गटाचे सहा आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व दिसून येत असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील वर्चस्व निर्माण व्हावे यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. विकासनिधी आणि प्रकल्पांच्या दृष्टीने पालकमंत्रिपद महत्त्वाचे असल्याने या पदासाठी भाजपाने जोर लावला असून शिंदे गट देखील यासाठी प्रयत्नशील आहे.
ठाणे जिल्ह्यात ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा भाईंदर, उल्हासनगर या सहा महानगरपालिका असून दोन नगरपरिषदा आणि दोन नगर पंचायती आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत विकासकामे करण्यासाठी निधीची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासते आणि विकासनिधीच्या वाटपाचे अधिकार असल्यामुळे पालकमंत्रिपद महत्त्वाचे मानले जाते. विशेष म्हणजे ज्याचे जिल्ह्यात जास्त आमदार, सत्तेतील त्या पक्षाकडे पालकमंत्रिपद जाते, असे सर्वसाधारणपणे समीकरण असते. त्यामुळे भाजपाच्या आशा वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपाने ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे.
शिंदे सरकार सत्तेवर असताना ठाण्याचे पालकमंत्रिपद शिवसेनेच्या शंभुराज देसाई यांच्याकडे होते. त्याआधी २०१४ ते २०१९ आणि २०१९ ते २०२२ या कालावधीत शिंदे यांच्याकडेच पालकमंत्रिपद होतं. शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी ठाण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देसाई यांच्याकडे सोपवली. आता शिंदे उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्याकडे पालकमंत्रिपद देण्यात यावं, अशी सेनेची मागणी आहे.
जिल्ह्यात भाजपचे अधिक आमदार असल्यानं पालकमंत्रिपद आम्हाला मिळावे, असा भाजप नेत्यांचा दावा आहे. ‘ठाण्यातील आमचा स्ट्राईक रेट १०० टक्के आहे. सेनेचे ६, तर आमचे ९ आमदार आहेत. त्यामुळे पालकमंत्रिपद आमच्या पक्षालाच मिळायला हवे, ही आमची मागणी अतिशय रास्त आहे,’ अशी भूमिका भाजपच्या संजय केळकर यांनी मांडली आहे.