कार्यालयातच कळणार कुठे फुटली जलवाहिनी?

नवीन सॉफ्टवेअर वापरण्याची ठामपाला गरज

नागपूर ‘निरी’ अभियांत्रिकी संशोधन संस्थेनं एक सॉफ्टवेअर तयार केले असून बसल्या जागी जलवाहिनी किंवा मलवाहिनी कुठे फुटली आहे याची माहिती मिळणार आहे. ठाण्यासारख्या शहरात जलवाहिनी फुटण्याचे प्रकार सतत घडत असल्याने ठाणे महापालिकेने देखील हे सॉफ्टवेअर वापरण्याची गरज निर्माण झाली आहे.

नागपूर महापालिकेसह चेन्नई, हैदराबाद आणि वर्धा प्रशासनाने या सॉफ्टवेअरचे यशस्वी प्रयोग केले आहे. जलवाहिनी, सांडपाणी पाईपलाईन खराब होणे, लिकेज होणे, फुटणे यासारख्या समस्या नेहमीच उद्भवत असतात. ठाणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये तर याचा सर्वाधिक त्रास होतो. अशा वेळी त्या दुरुस्त करताना बरीच दमछाक होते. जलवाहिनी नेमकी कुठे खराब आहे, गळती आहे याची खात्रीशीर माहिती मिळत नाही.

नागपुरातील ‘निरी’ संशोधन संस्थेनं एक असे सॉफ्टवेअर केले ज्यामुळं नेमकी कुठे खराब जलवाहिनी आहे. निरीचे शास्त्रज्ञ आभा सारगावकर आणि आशिष शर्मा यांनी हे ‘रिस्क पीनेट 2.0’ हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. गणितीय आधारावर हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. शहरातील सर्व जलवाहिन्या, मलवाहिन्या यांचा एक डेटा तयार करण्यात आला. यासाठी त्यांनी ‘सॅफ्रा डब्लूडीएस’ नावाचे पोर्टल तयार केलं.

शहरात कुठे-कुठे जलवाहिनी आहे, किती वर्षे जुनी आहे, किती व्यासाची आहे, किती दाब आहे, कधी बदलले पाहिजे याची नकाशासह संपूर्ण माहिती टाकण्यात आली आहे. हे पोर्टल ‘रिस्क पीनेट’ शी जोडण्यात आले आहे. त्यामुळे जलवाहिनी आणि सांडपाणी वाहिनीची अचूक माहिती मिळते आणि काही अडचण असल्यास ती त्वरित दुरुस्त करता येते.

ठाण्यात जलवाहिन्या वारंवार फुटत असतात. त्या दुरुस्त करताना अनेक दिवस खर्च होतात. जमिनीखाली गळती होत असेल तर त्याची माहिती वेळीच मिळत नाही. त्यामुळे रोज लाखो लिटर पाणी वाहून जाते तर नागरिकांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने हे सॉफ्टवेअर वापरात आणण्याची मागणी होत आहे.