ठाणे: २९ वर्षांपूर्वी स्व.आनंद दिघे यांनी सुरू केलेली ३१ डिसेंबरला रक्तदान शिबिराची परंपरा आजही कायम असून रक्तानंद ग्रुपतर्फे यंदाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदा या उपक्रमाचे ३० वे वर्ष आहे. दरवर्षी हजारो तरूण-तरूणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी २५ पेक्षा जास्त वेळा रक्त देणाऱ्या रक्तदात्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रक्तकर्ण पुरस्काराने गौरविले जाणार आहे. तसेच प्रत्येक रक्तदात्याला सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक सुद्धा दिले जाणार आहे. या कार्यक्रमास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रविंद्र फाटक, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, माजी महापौर मिनाक्षी शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर आदींच्या उपस्थितीत रक्तदान सोहळा पार पडणार आहे.
या शिबिरास छत्रपती शिवाजी मैदान, जांभळी नाका, तलावपाळी, ठाणे येथे ३१ डिसेंबर २०२४ सायंकाळी ६ पासून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून रक्तदानासारख्या महान व राष्ट्रीय कार्यास हातभार लावावा, असे आवाहन शिवसेना ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार यांनी केले आहे.