भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा रविवारी संपला. या दौऱ्यात भारताने कसोटी मालिका १-२ ने तर एकदिवसीय मालिका ०-३ ने गमावली. केएल राहुल या मालिकेमध्ये एकदिवसीय सामन्याचं नेतृत्व करत होता. मात्र राहुलच्या नेतृत्वाखाली भारताला एकही सामना जिंकता आला नाही. या पराभवानंतर भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने के. एल. राहुलचं कौतुक केलंय. त्याने के. एल. राहुल चांगली कामगिरी करतोय असं सांगितलंय. विराट कोहलीकडून दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधीच कर्णधारपद काढून घेण्यात आलं. त्याच्या जागी रोहित शर्माच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र दुखापतीमुळे रोहित मैदानात उतरु न शकल्याने राहुलने संघाचं नेतृत्व केलं.
राहुलचं कौतुक द्रविडने केलं असलं तरी त्याने संघाच्या कामगिरीनवर नाराजी व्यक्त केलीय. संघाला मौक्याच्या क्षणी चांगली कामगिरी करता आली नाही, अशी खंत द्रविडने व्यक्त केलीय. “राहुलने चांगली कामगिरी केली. मात्र निकाल आमच्या बाजूने लागले नाहीत. त्याने आता कुठे नेतृत्व करतायला सुरुवात केलीय. कर्णधार म्हणून तो दिवसोंदिवस अधिक उत्तम होत जाईल,” असा विश्वास द्रविडने व्यक्त केलाय. राहुलने एकदिवसीय सामन्याबरोबरच दुसऱ्या कसोटी सामन्यातही संघाचं नेतृत्व केलं होतं. या सामन्यातही भारताचा पराभव झाला होता. म्हणजेच कर्णधार म्हणून राहुलला एकही सामना या दौऱ्यात जिंकता आला नाही. आता भारतीय संघ फेब्रुवारी महिन्यात वेस्ट इंडीजविरोधात मालिका खेळणार आहे.
द्रविडने ही मालिका आमचे डोळे उघडणारी होती असंही म्हटलंय. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला बराच वेळ आहे. संघ येणाऱ्या काळात चांगली कामगिरी करेल, असा विश्वास द्रविडने व्यक्त केलाय. मार्च महिन्यानंतर आम्ही जवळजवळ १० महिन्यांनी एकदिवसीय सामने खेळण्यासाठी मैदानात उतरलो होतो. संघ फार मोठ्या कालावधीसाठी या फॉरमॅटपासून दूर होता. विश्वचषकाआधी आम्ही बरेच सामने खेळणार आहोत, असं द्रविड म्हणाला.
तसेच द्रविडने या मालिकेमध्ये अनेक महत्वाचे खेळाडू खेळले नसल्याचा मुद्दाही मांडला. सहाव्या, सातव्या आणि आठव्या क्रमांकावर जे खेळाडू खेळतात ते सिलेक्शनसाठी उपलब्ध नव्हते. हे खेळाडू उपलब्ध होतील तेव्हा संघात निश्चित बदल दिसतील. संघाला शेवटच्या दोन्ही सामन्यांमध्ये धावसंख्येचा पाठलाग करताना पराभवाचं तोंड पहावं लागलं. दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघ ३० षटकांपर्यंत चांगला खेळला. मात्र तळातील फलंदाजांनी खराब फटकेबाजी केल्याने सामने गमावावे लागले, असं द्रविड म्हणाला.
दीपक चहरच्या (३४ चेंडूंत ५४ धावा) झुंजार अर्धशतकानंतरही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रविवारी झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला चार धावांनी पराभव पत्करावा लागला. कसोटी मालिकेत २-१ अशी सरशी साधणाऱ्या यजमान आफ्रिकेने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले.