मुंबईत पाणीकपात; वागळे-नौपाड्याला धसका

ठाणे: बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील पाणी कपातीचा परिणाम ठाण्यातील वागळे आणि नौपाड्यातील परिसरांवर होणार असून या ठिकाणी देखील कपात लागू करण्यात येणार आहे. या सर्व भागांना मुंबई महापालिकेकडून पाणीपुरवठा होत असल्याने या भागांमध्ये ही कपात लागू करण्यात येणार आहे.
मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यामध्ये अवघे १० टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे. या दृष्टीने मुंबई महानगरामध्ये 30 मे पासून पाच टक्के तर 5 जूनपासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र मुंबई महापालिकेकडून ठाणे शहराला देखील पाणीपुरवठा होत असल्याने ठाण्याच्या नौपाडा आणि वागळे भागातही ही कपात लागू करण्यात येणार असल्याचे ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्राला विविध प्राधिकरणांच्या माध्यमातून पाणी पुरवठा होत असतो. यामध्ये मुंबई महापालिकेकडून दररोज ८५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत असून यामध्ये वागळे आणि नौपाडा अशा परिसरांना हे पाणी दिले जाते. मात्र आता मुंबई महापालिकेनेच पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला असल्याने ठाण्याच्या ज्या-ज्या भागात मुंबई महापालिकेकडून पाणीपुरवठा होतो त्या-त्या भागात ही कपात लागू करण्यात येणार आहे.
ठाणे शहरातील सर्वच नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून पाणीबचत करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
ठाण्यातील या परिसरात होणार पाणी कपात
हाजूरी, लुईसवाडी, रघुनाथ नगर, नामदेव वाडी, साईनाथ नगर, रामचंद्र नगर १, किसन नगर १ आणि २, शिवाजी नगर, पडवळ नगर, जनता झोपडपट्टी, शिवशक्ती नगर, करवालो नगर, अंबिका नगर, ज्ञानेश्वर नगर, जय भवानी नगर, काजूवाडी, जिजामाता नगर, बाळकूम पाडा नं १, लक्ष्मी नगर, आंबेडकर नगर, मानपाडा (नळपाडा), कोपरी धोबीघाट, गावदेवी (लुईसवाडी) जलकुंभ, टेकडीवाडी जलकुंभ, भटवाडी, इंदिरा नगर, आनंद नगर या परिसरात मुंबई महापालिकेने ठरवल्याप्रमाणे पाच आणि १० टक्के पाणीकपात होणार आहे.