श्रीमंत व्हायचंय?

श्रीमंत होण्याचे सर्वांचेच स्वप्न असते. किमान आजच्यापेक्षा भविष्यात अधिक चांगली आर्थिक परिस्थिती असावी असे प्रत्येकाला वाटत असते. पण हे कसे? याची फार स्पष्टता असतेच असे नाही. आज आहोत त्यापेक्षा अधिक श्रीमंत होण्यासाठी उत्पन्न जितके महत्वाचे तितकेच मिळवलेल्या उत्पन्नाचे व्यवस्थापन करणे देखील महत्त्वाचे आहे.

आपल्या आजूबाजूला जे श्रीमंत दिसतात ते श्रीमंत कसे झाले? जर त्यांनी मिळवलेले सर्व उत्पन्न विविध कारणास्तव खर्च केले असते तर ते श्रीमंत झाले असते का? नक्कीच नाही. म्हणजेच, उत्पन्नानंतर खर्च करून उरलेल्या रकमेचे जे व्यवस्थापन केले जाते त्यावर अवलंबून असते श्रीमंत होण्याची शक्यता. उत्पन्नानंतर आवश्यक तितकी गुंतवणूक केल्यानंतर उरलेली रक्कमच खर्च करावी. अर्थात हे बहुतांश लोकांना अवघड वाटू शकते किंवा असू शकते. परंतु एक नक्की की, उत्पन्नाइतकेच आर्थिक व्यवस्थापन हे आर्थिक भविष्य ठरवत असते.

आधी बचत व गुंतवणूक यातील फरक समजून घ्यावा लागेल व तो समजण्यासाठी महागाई किंवा इन्फ्लेशन म्हणजे काय हे समजावे लागेल. महागाई म्हणजे आपण वापरत असलेल्या चलनाच्या क्रयशक्तीमध्ये होणारी घट. ज्याचा परिणाम आपल्याला विविध वस्तू व सेवेच्या मुल्यामध्ये होणाऱ्या वाढीच्या स्वरूपात दिसून येतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, आज हातात असलेल्या शंभर रुपयांमध्ये जितकी वस्तू विकत घेण्याचे सामर्थ्य असते ते दोन वर्षांनी कमी होऊन तितक्याच किमतीमध्ये तीच वस्तू कमी प्रमाणात मिळते. याला महागाई दर म्हणतात. म्हणून फक्त बचत करून उपयोगाचे नाही, तर बचत केलेल्या रकमेने महागाईच्या दरावर मात करून अधिक सामर्थ्य कमावणे आवश्यक असते आणि यालाच म्हणतात योग्य गुंतवणूक.

साठवलेले रुपये जर बँकेच्या बचत खात्यात असतील व त्यावर मिळणारे व्याज जर सरासरी साडेतीन ते चार टक्के असेल परंतु महागाईचा दर त्याहून अधिक असेल तर आपण बाजूला ठेवलेल्या रक्कमेची ताकद कमी होते. तोच नियम ठेवींच्या बाबतीत असतो. म्हणजे गुंतवणूक करण्यामागे ध्येय असते की, गुंतवलेल्या रकमेने किमान महागाई दरावर मात करावी. याचा अर्थ बँकमध्ये पैसे ठेवू नये असा नाही. या लेखात आपण गुंतवणुकीच्या मानसिकतेबाबत चर्चा करणार आहोत. ढोबळ मानाने, अचानक अडचण आली तर किमान दोन-तीन महिने तरी गुजराण करता येईल इतकी रक्कम सुरक्षित राहील व लगेच वापरता येईल ज्याला लिक्विडीटी म्हणतात. तितकी रक्कम बँकेमध्ये ठेवण्याचा सल्ला गुंतवणूकदारांना दिला जातो.

बँमेमधल्या ठेवी किंवा ज्याला FD म्हणतात त्या व्यतिरिक्त गुंतवणूक करण्याचे विविध मार्ग आहेत. परंपरागत चालत आलेले काही मार्ग म्हणजे स्थावर मालमत्तेमध्ये केलेली गुंतवणूक. आजकाल जमिनीव्यतिरिक्त अजून काही पर्याय उपलब्ध झालेले आहेत ज्यात घर, दुकान, कार्यालय किंवा औद्योगिक कामासाठी वापरल्या जाणाऱ्या जागांचा समावेश होतो. दुसरा पर्याय म्हणजे मौल्यवान धातू जसे सोने किंवा चांदी. काही लोकं दागिने, हिरे, मोती किंवा या श्रेणीत येणाऱ्या इतर खरेदीला देखील गुंतवणूक समजतात. निश्चित व सुरक्षित परताव्यासाठी सरकारी योजनांमध्ये काही रक्कम ठेवली जाते, सरकारी बॉण्ड्स असतात. विमा क्षेत्रातील कंपन्यासुध्दा गुंतवणुकीचे काही मार्ग सुचवतात. त्याव्यतिरिक्त म्युच्युअल फंड्स, शेअर्स किंवा रोखे, विविध चलने ज्यात सध्या भर पडली आहे क्रिप्टोकरन्सीची. काही व्यक्ती कलाकृती, पुरातन वस्तू वगैरेमध्ये देखील गुंतवणूक करतात. या व्यतिरिक्त देखील काही गुंतवणुकीचे प्रकार किंवा मार्ग आहेत. त्यातील कोणता मार्ग आपण स्विकारावा किंवा स्विकारू नये हे ज्याचे त्याने ठरवावे. परंतु ते ठरवण्याआधी काही चुका टाळणे महत्वाचे. एकंदरीत डोळसपणे, नियमांचे पालन करून बचत व गुंतवणूक केली तर आजच्यापेक्षा अधिक श्रीमंत होणे शक्य आहे.

* अमोल परांजपे
मनी मॅटर्झ
9821710123
info@moneymatterz.net