वंदे भारत रेल्वेला ठाणे स्थानकात थांबा नाही

खासदार राजन विचारे यांचे रेल्वेमंत्री व मध्य रेल्वे महाप्रबंधकांना पत्र

ठाणे : मुंबई-सोलापूर वंदे भारत रेल्वेला ठाणे स्थानकात थांबा मिळावा, अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.

ठाणे रेल्वे स्थानकात गेल्याकाही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नामुळे रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानकाचा कायापालट केला जात आहे. ठाणे रेल्वे स्थानकात अनेक लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांना थांबा आहे. त्यामुळे ठाणे आणि नवी मुंबई येथून हजारो नागरिक ठाणे रेल्वे स्थानकातून लांब पल्ल्यांच्या गाड्या पकडण्यासाठी येत असतात. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकाला महत्त्व आहे. शुक्रवारपासून मुंबई-शिर्डी आणि मुंबई सोलापूर या दोन वंदे भारत रेल्वे सेवेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. परंतु यातील मुंबई-सोलापूर या रेल्वेला ठाणे रेल्वे स्थानकात थांबा देण्यात आला नाही. मुंबईहून ही वंदे भारत रेल्वे थेट कल्याणला थांबणार आहे.
त्यामुळे श्री. विचारे यांनी मुंबई- सोलापूर वंदे भारत रेल्वेला थांबा मिळावा अशी मागणी केली. ठाणे, नवी मुंबई शहरात सोलापूर भागातील लाखो नागरिक वास्तव्यास आहेत. या गाडीला ठाणे रेल्वे स्थानकात थांबा मिळाला असता तर त्यांना मोठा दिलासा मिळाला असता. तर सोलापूरला जाणाऱ्या प्रवाशांना कल्याणला जाण्याची गरज लागणार नाही. ठाणे रेल्वे स्थानकात मुंबई-सोलापूर वंदे भारत रेल्वेला थांबा मिळाल्यास प्रवाशांचा वेळही वाचणार आहे, असे श्री.विचारे यांनी पत्रात नमूद केले आहे.