कांदा टिकवण्यासाठी रासायनिक पावडरचा वापर

नवी मुंबई : जुन्या कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने साठवणूकदार कांदा जुना होण्यासाठी आणि अधिक टिकण्यासाठी त्यावर रासायनिक पावडरचा मारा करत आहेत. असा कांदा आरोग्यास हानिकारक असल्याने अशा प्रकारे रासायनिक पावडरचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

वाशीतील एपीएमसी फळ बाजारात आंबा हंगामात आंबा झटपट पिकावा म्हणून त्यावर रसायनांचा वापर करीत असल्याच्या तक्रारी दरवर्षी येत असतात. मात्र आता कांद्यावर देखील रासायनिक पावडरचा मारा करीत असल्याचा आरोप येथील व्यापाऱ्यांनी केला आहे. बाजारात नवीन कांद्याला कमी दर तर जुन्या कांद्याला अधिक दर असतो. कांद्याचे उत्पादन कमी झाल्यास साठवणूक केलेल्या कांद्याला अधिक भाव मिळतो. त्यामुळे बरेच साठवणूकदार कांदा स्वस्त असला ती त्याची खरेदी करून त्याची साठवणूक करतात. मात्र साठवुन ठेवलेला कांदा खराब होऊ नये म्हणून त्यावर बीएससी पावडर, सल्फर पावडर, पोलिगर पावडर अशा रासायनिक पावडरचा मारा करतात.

अहमद नगर, पारनेर, निघोज आणि जामखेड आदी ठिकाणी अशा पावडरचा वापर अधिक होत आहे. अशा कांद्याचे सेवन अधिक झाल्यास सर्दी, जुलाब, खाज, श्वासोच्छवास घेण्यास त्रास तसेच कॅन्सरसारखा आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा प्रकारे रासायनिक पावडरचा वापर करणाऱ्या साठवणूकदारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कांदा-बटाटा व्यापारी मनोहर तोतलानी यांनी केली आहे.