केंद्रीय मंत्री अमित शहा आज नवी मुंबईत

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीचे बिगुल पुढील आठवड्यात वाजण्याचे संकेत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत भाजप अधिक जागा कशा जिंकेल या करीता केंद्रीय नेतृत्वाने लक्ष घातले आहे. याच अनुषंगाने केंद्रीय मंत्री आमित शहा नवी मुंबईत दाखल होत आहेत. यावेळी ते ठाणे आणि पालघर जिल्ह्यासह कोकणातील विधानसभा क्षेत्रांबाबत कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने सरशी घेत राज्यात जोरदार मुसंडी मारली. यात सर्वाधिक फटका भाजपला बसला असून २०१९च्या तुलनेत भाजपच्या १४ जागा घटल्या. त्यामुळे लोकसभेचा कित्ता राज्याच्या विधानसभा निवडणुकीत गिरवला जाऊ नये म्हणून भाजपने सावध पवित्रा घेतला आहे. यासाठी केंद्रीय स्तरावरून रणनीती आखली जात आहे. याचाच भाग म्हणून कोकण तसेच ठाणे, पालघर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शहा मंगळवारी नवी मुंबईत येत आहेत.

वाशीतील सिडको प्रदर्शिनी केंद्रात या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठक नवी मुंबईत होणार असल्याने नवी मुंबईत महायुतीतील शिंदे समर्थक विजय चौगुले व विजय नाहटा यांच्या मार्फत भाजपला दिल्या जात असलेल्या आव्हानाबाबत तक्रार केली जाते का? भाजपच्या दोन्ही जागांवर उमेदवारी घोषित केली जाणार का याकडे भाजप कार्यकर्त्याच्या नजरा असणार आहेत.