कल्याण : शिवसेना फुटीनंतर शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे प्रथमच कल्याण शहराच्या दौऱ्यावर येत्या शनिवारी येणार आहेत. या निमित्ताने त्यांचे जंगी स्वागत करण्याची तयारी कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे.
या भेटीच्यावेळी उध्दव ठाकरे कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आणि त्याविषयीची व्यूहरचना या विषयावर शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.
शिवसेना फुटीनंंतर उध्दव ठाकरे यांनी कल्याण, डोंंबिवलीत यावे म्हणून दीड वर्षाच्या कालावधीत उबाठा पक्षाचे या भागातील कार्यकर्ते, पदाधिकारी प्रयत्नशील होते. या मागणीला ठाकरे कुटुंबीयांकडून प्रतिसाद दिला जात नव्हता. युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही पाठ फिरवल्याने कार्यकर्ते नाराज होते. या नाराजीतून गेल्या वर्षी डोंबिवलीत कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख सदानंद थरवळ यांंनी राजीनामा दिला होता. तो ठाकरे यांच्या भेटीनंतर मागे घेण्यात आला.
कल्याण लोकसभा मतदारसंंघात विद्यमान खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्याविषयी नाराजी असल्याची जोरदार चर्चा आहे. याशिवाय त्यांचे मित्रपक्षातील आमदारांशी सख्य नसल्याची चर्चा असल्याने या संधीचा फायदा उठविण्याची तयारी उबाठा पक्षाने सुरू केली आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, २७ गाव असा दौरा करणार असून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, असे शिवसेनेतील उबाठा पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
उध्दव ठाकरे प्रथमच कल्याण दौऱ्यावर येणार असल्याने त्यांचे जोरदार स्वागत करण्याची तयारी कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. शिवसेनेचे उबाठाचे कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरूनाथ खोत, स्थानिक पदाधिकारी विजय साळवी, चंंद्रकांत बोडारे, धनंंजय बोडारे, रमेश जाधव, हर्षवर्धन पालांडे, शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वागताच्या तयारीचे नियोजन केले जात आहे.
कल्याण लोकसभेसाठी उबाठाकडून तगडा उमेदवार देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला घाम फोडण्याची व्यूहरचना उबाठाकडून आखली जात आहे. कल्याण लोकसभेसाठी सुभाष भोईर, सदानंद थरवळ यांंची नावे आघाडीवर आहेत. या कामासाठी मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांची ग्रामीण भागातून मदत घेतली जाणार असल्याची चर्चा आहे. डोंबिवलीतही भाजपचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार शिंदे यांच्यात सख्य नसल्याचे समजते. या सर्व संधींचा लाभ उठविण्याची तयारी उबाठाने सुरू केली आहे.