ओवळा-माजिवडे मतदारसंघात दोन शिवसेनेत होणार सामना

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रताप सरनाईक यांनी भरला अर्ज

ठाकरे गटाचे नरेश मणेरा यांचेही शक्तिप्रदर्शन

ठाणे : ओवळा-माजिवडे मतदारसंघात दोन शिवसेनेत काटे की टक्कर होणार असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. तर ठाकरे गटाने नरेश मणेरा यांना उमेदवारी दिली असून त्यांनी आज शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरला.

आमदार प्रताप सरनाईक यांनी विजयाची हॅट्रिक मारली असून यावेळी सरनाईक चौकार मारतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. प्रताप सरनाईक यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व हजारो कार्यकर्ते समर्थक, चाहत्यांच्या साक्षीने श्री.सरनाईक यांनी अर्ज दाखल केला. खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, शिवसेना व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणे लोकसभेतील सर्वात मोठा आणि दोन महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र असलेला १४६ ओवळा माजिवडा ही विधानसभा मतदारसंघ ओळखला जातो.

आमदार प्रताप सरनाईक यांचा अर्ज भरण्यासाठी वर्तकनगरमधील विहंग पाम क्लब येथून ढोलताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने शिवसेना व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मुंबई टी २० लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक, युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक, माजी नगरसेविका परिषा सरनाईक यांच्यासह सूना अनाहिता सरनाईक, डॉ. कश्मिरा सरनाईक संपूर्ण सरनाईक परिवार उपस्थित होता. रॅलीमध्ये चौकाचौकात प्रताप सरनाईक यांचे पदाधिकारी, नागरिकांनी स्वागत करत त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

ठाकरे गटाकडून नरेश मणेरा यांचा अर्ज

ओवळा-माजीवडा विधानसभा मतदार संघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार नरेश मणेरा यांनीही शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. मणेरा यांनी शास्त्रीनगर येथील दोधा इंदिसे चौकापासून पोखरण रोड नं.१ मार्गे शिव शाहू फुले आंबेडकर सभागृहपर्यंत मिरवणूक काढत शक्तिप्रदर्शन केले.

नरेश मणेरा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी सकाळी नऊ वाजल्यापासून शास्त्रीनगर चौकात जमायला सुरुवात केली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी पक्षाचे चिन्ह असलेल्या टोप्या, मफलर परिधान केले होते. तर, काहींनी भगवा फेटा बांधला होता. प्रत्येक कार्यकर्ता हातात पक्षाचा झेंडा आणि चिन्ह घेऊन मिरवणूकीत सहभागी झाला होता. या मिरवणुकीत महिला कार्यकर्त्यांची संख्या सर्वाधिक असल्याची पाहायला मिळाली. सुमारे ११च्या दरम्यान मिरवणुकीला सुरुवात झाली. ही मिरवणूक शास्त्रीनगर येथील दोधा इंदिसे चौकातून निघाली, देवदया नगर येथून पोखरण रोड नं.१ मार्गे शिव शाहू फुले आंबेडकर सभागृहपर्यंत काढण्यात आली होती.