भाईंदर: विरार पूर्व कारगिल नगर परिसरात वीजेचा झटका बसून दोघांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण जखमी झाले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमावेळी ध्वजारोहण करताना लोखंडी रॉडचा ट्रान्सफॉर्मरला स्पर्श झाल्याची घटना घडली. संध्याकाळी सुमारे 200 लोक या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जमले होते, परंतु रात्री 10.30 वाजता या ठिकाणी सदर दुर्घटना घडल्याने शोककळा पसरली होती.
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमाच्या मिरवणुकीसाठी लोखंडाची ट्रॉली तयार करण्यात आली होती. यावेळी काही लोक ट्रॉलीवर बँजो वाजवत होते तर काही लोक त्याला ढकलत होते. मात्र ट्रॉलीवरील लोखंडी रॉड ट्रान्सफॉर्मरवर आदळला. ट्रॉली रस्त्यावरून जात असताना रस्त्यावर खड्डे असल्याने ट्रॉली एका बाजूला झुकली आणि लोखंडी रॉडचा ट्रान्सफॉर्मरला स्पर्श झाला. ट्रॉलीची फरशी लाकडाची असला तरी त्यामुळे ट्रॉलीच्या फरशीवर बसलेल्या लोकांना विजेचा झटका बसला नाही, मात्र ट्रॉली ढकलत असलेल्या लोकांना विजेचा धक्का बसल्याने ते चांगलेच भाजले.
सुमित सूद, रुपेश सुर्वे अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे असल्याचे विभागीय सहायक पोलिस आयुक्त रामचंद्र देशमुख यांनी सांगितले. दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात तीन जण गंभीर भाजले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर पोलिसांचा मोठा ताफा येथे दाखल झाला. येथे जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात आले. याप्रकरणी आम्ही गुन्हा दाखल करणार असल्याचे विरार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.