बाळ्या मामांना भिवंडीतील दोन बूथ ठरले तारणहार

अल्पसंख्याक मतदारांनी विजयाचा मार्ग केला सुकर

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघातील भिवंडी पूर्व आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघात ८३ आणि ७६ बूथवर भारतीय जनता पक्षाला पाचशेपेक्षाही कमी मते मिळाली तर महाविकास आघाडीला मात्र या मतदारसंघात ८० हजारपेक्षाही जास्त मतदान झाले. या मताधिक्याने मविआचा विजयाचा मार्ग सुकर झाला.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत झाली. त्यामध्ये महाविकास आघाडीचे सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांचा ६६,१२१ मतांनी प्रभाव करून भाजपाच्या ताब्यातील ही जागा खेचून घेतली. या मतदारसंघात श्री. म्हात्रे यांना चार लाख ९९ हजार मते मिळाली होती. त्यामध्ये भिवंडी पश्चिम आणि पूर्व या दोन विधानसभा मतदार संघातील मतदारांचे मताचे दान मोलाचे ठरले.

भिवंडी पश्चिम मतदार संघातील आझमी नगर आणि वाजा मोहल्ला या भागातील ८३ बूथवर कपिल पाटील यांना अवघी ४४१ मते मिळाली आहेत तर बाळ्या मामा यांना ५२ हजार ७७३ मते मिळाली आहेत. या भागातील बूथ क्रमांक ७५ येथे श्री पाटील यांना शून्य मते तर बाळ्या मामा यांना ६७० मते मिळाली. बूथ क्रमांक ४७ येथे श्री. पाटील यांना अवघी दोन मते तर श्री म्हात्रे यांना ४२० मते मिळाली. भिवंडी पूर्व भागातील असबीबी आणि मिल्लत नगर या ७६ बूथवर कपिल पाटील यांना फक्त ३२५ मते मिळाली आहेत तर बाळ्या मामा म्हात्रे यांना ३७,२९९ इतकी मते मिळाली आहेत. या मतदार संघातील बूथ क्रमांक ३४ येथे श्री.पाटील यांना फक्त एक मत मिळाले. तर श्री.म्हात्रे यांना ६१० मते मिळाली. बूथ क्रमांक १९५ वर श्री. पाटील यांना दोन तर श्री. म्हात्रे यांना ४३१ मते मिळाली आहेत.

भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिम या मतदार संघात अनुक्रमे बाळ्या मामा म्हात्रे या एक लाख ८,११३ आणि एक लाख ८,३५८ मते मिळाली. कपिल पाटील यांना ४५,३७३ आणि ४७,८७८ इतकी मते मिळाल्याने श्री. म्हात्रे यांनी ६६,१२१ इतके मताधिक्य घेऊन विजयी झाले.

अल्पसंख्याक मतदारांनी एकगठ्ठा मतदान श्री.म्हात्रे यांना केले, त्यामुळेच श्री.म्हात्रे यांचा विजय झाला, असे भाजपाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.