ठाणेकर बॅडमिंटनपटूने रचला इतिहास
ठाणे: पुण्यामध्ये झालेल्या पहिल्या महाराष्ट्र राज्य 15 व 17 वर्षाखालील राज्य अजिंक्यपद स्पर्धेत साडेसोळा वर्षीय ठाणेकर सर्वेश यादवने एकही गेम न गमावता एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी या तीनही गटांमध्ये तीन सुवर्णपदके मिळवली आहेत. अशा प्रकारची कामगिरी या पूर्वी राज्यात दुसऱ्या कुठल्याही खेळाडूने केलेली नाही.
सर्वेश यादव तेरा वर्षाचा असताना त्याने सातारा येथून ठाण्याला बॅडमिंटनमध्ये करिअर करण्यासाठी स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. आणि गेल्या चार वर्षांच्या अथक मेहनतीनंतर आलेले फळ म्हणजे हा तिहेरी मुकुट होय.
सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेच्या खेळाडूंनी ही स्पर्धा सर्वार्थाने गाजवली. सर्वेशचा दुहेरी मुलांमध्ये साथीदार ठाणेकर ओम गवंडी आणि मिश्र दुहेरीसाठी ठाण्याच्या प्रशिक्षण योजनेतीलच आदिती गावडे होती.
अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरुष एकेरीत सर्वेश यादवने पहिल्या फेरीपासून प्रभुत्व प्रस्थापित करीत अंतिम फेरीत प्रवेश केला आणि अमेय नाकतोडे या खेळाडूचा २१-११,२१-१६ असे हरवून सुवर्णपदकाची सुनिश्चिती केली. मिश्र दुहेरीत सर्वेशने ठाण्याच्याच अदितीला साथीला घेत प्रणय गाडेवार-निशिका गोखे या जोडीचा २१-१३, २१-११ असा पराभव करीत एकहाती विजय मिळवला आणि दुहेरी मुकुट प्राप्त केला. पुरुष दुहेरीत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या ओम गवंडी याला जोडीला घेत अनेक चुरशीच्या सामन्यांना आपल्या आक्रमक खेळीने जिंकत अंतिम फेरीत निधिष मोरे-सानिध्य एकडे या जोडीला २१-१४,२१-१४, अमेय नाकतोडेला २१-११,२१-१६ असे नमवून आपल्या पहिल्या वहिल्या तिहेरी मूकुटाची सुनिश्चिती केली.
त्याच्या या यशाबद्दल सर्वांनीच त्याचे कौतुक केले असून त्याच्या या यशात श्रीकांत भागवत, मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर आणि विघ्नेश देवळेकर या योजनेतील ज्येष्ठ प्रशिक्षकांचा सक्रिय सहभाग होता. या यशाबद्दल महापालिकेच्या क्रीडा उपायुक्त मीनल पालांडे यांनी देखील त्याचे खास अभिनंदन केले आहे. तर योजनेचे प्रमुख श्रीकांत वाड यांनी सर्वेशला त्याच्या उज्वल भविष्यासाठी खास शुभेच्छा दिल्या आहेत.
विशेष म्हणजे सर्वेश यादव तसेच ओम गवंडी या सय्यद मोदी योजनेच्या दोन्ही खेळाडूंची महाराष्ट्र शासनाच्या अनिवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये देखील निवड झाली आहे.
त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी देखील जिल्हा क्रीडा विभागातर्फे त्याचे अभिनंदन केले आहे.