ठाणे: निष्ठावानांच्या महाराष्ट्रात गद्दार निर्माण झाले हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला.
घोडबंदर रोड येथील आनंदनगर परिसरातील ठाणे महापालिका मैदानात आयोजित महाराष्ट्र महोत्सवाला विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी भेट दिली. त्यावेळी हा घणाघाती आरोपी त्यांनी केला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वैष्णवी प्रतिष्ठानतर्फे १२ फेब्रुवारी, २०२३ पर्यंत एकूण आठ दिवसांच्या भव्य महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. वैष्णवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेश मणेरा यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली घोडबंदर रोड, आनंदनगर येथील मुच्छाला कॉलेजजवळ असलेल्या महापालिका मैदानात करण्यात आले आहे. या महोत्सवाला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट देऊन महोत्सवातील स्टॉलला भेट देऊन पाहणी केली. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक नरेश मणेरा यांनी दानवे यांचा सत्कार करून त्यांचे स्वागत केले. यानंतर अंबादास दानवे यांनी कोळी-आगरी गीतांच्या कार्यक्रमाचा देखील आस्वाद घेतला.
महाराष्ट्र महोत्सवाच्या माध्यमातून आई भवानीकडे हीच प्रार्थना आहे की, निष्ठावानांच्या, शिवाजी महाराजांचा विचार घेऊन चालणारे व रंजल्या गांजल्यांना मदत करणाऱ्या लोकांच्या हाती हा महाराष्ट्र आला पाहिजे, असे दानवे यांनी यावेळी म्हटले. शिवसेनेच्या मागे जनता आहे त्यामुळे गद्दारांनी कितीही प्रयत्न केला तरी ठाणे महापालिकेवर शिवसेनेचाच महापौर, उपमहापौर बसेल असा दावाही दानवे यांनी केला.