उद्या अद्भुत शक्तीप्रदर्शन करत मुख्यमंत्री दाखल करणार अर्ज

ठाणे : शिवसेना शिंदे गटाने उमेदवारांची यादी अद्याप जाहिर केली नसली तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वप्रथम शिवसेना पक्षाचा उमेदवार म्हणून गुरुवारी २४ ऑक्टोबरला आपला अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी भव्य मिरवणूक काढून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी ठाण्यातील सर्व शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची सुरुवात आज २२ ऑक्टोबरपासून झाली आहे. २९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. पण मधे दोन दिवस सुट्ट्या येत असल्याने उमेदवारांच्या हाती केवळ पाचच दिवस आहेत. त्यामुळे पहिल्या तीन दिवसांमध्ये पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली आहे, ते अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. महायुतीच्या भाजप, मनसे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने ठाणे जिल्ह्यातील आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहिर केली आहे. पण शिवसेना शिंदे गटाची यादी जाहिर झाली नसली तरी पक्षाचे प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी २४ ऑक्टोबरला दाखल करणार आहेत.

टेंभीनाका येथील शक्तीस्थळाला नमन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी येथील परबवाडी शाखेत पोहचतील. सकाळी १० वाजता परबवाडी ते आयटीआय सेंटरपर्यंत भव्य मिरवणूक काढत यावेळी शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. या मिरवणुकीमध्ये फटाक्यांची आतषबाजी होणार आहे. तसेच विविध वाद्यवृंदाचे पथकही असणार आहेत.

हे शक्तीप्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सोमवारी शिवसेना शिंदे गटाची बैठक झाली. यावेळी केवळ कोपरी-पाचपाखाडी नव्हे तर ठाण्याच्या सर्व भागातील पदाधिकार्‍यांना, युवासैनिकांना, महिला आघाडीला हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.