टोलमुक्ती हे मनसैनिकांच्या आंदोलनाचे यश – राज ठाकरे

ठाणे : मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही पॉइंटवरील टोल नाक्यावरून हलक्या वाहनांना टोल मुक्त करण्यात आले असून हा विजय मनासैनिकांच्या आंदोलनाचा असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

टोलमुक्ती आणि ठाण्यातील विनयभंग प्रकरणी राज ठाकरे हे शुक्रवारी ठाण्यात आले होते. तत्पूर्वी आनंदनगर टोल नाका येथे पोहोचताच मनसे कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी युवा नेते अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे, आमदार राजू पाटील, अभिजित पानसे, अविनाश जाधव आदी उपस्थित होते.

पत्रकारांशी बोलताना त्यांनी बदलापूरसारख्या सर्व गोष्टी अंगावर घेऊ नका असा इशारा ठाणे पोलिसांना दिला आहे. आरोपी कोणत्याही पक्षाचा असो, त्याला पंखाखाली घेऊ नका असा सल्ला देखील ठाकरे यांनी राजकीय पक्षांना दिला आहे. टोलमुक्तीचा निर्णय हे मनसैनिकांच्याच आंदोलनाचे यश असल्याचे सांगत त्यांनी यावेळी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचेही कौतुक केले.

शुक्रवारी ठाण्यात आलेल्या राज ठाकरे यांनी ठाण्यातील विनयभंग प्रकरणात ठाणे नगर पोलीस ठाण्यात जाऊन भेट घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. अशा प्रकारची विनयभंगाची केस झाल्यानंतर अशा लोकांना जामीन मिळतो तरी कसा हेच मला कळत नाही. कोर्ट तरी यांना जामीन कसे देते?असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. पीडित मुलीचा जबाब परत घ्या आणि जो कोणी आहे त्याला अटक करा, असे मी पोलिसांना सांगितले असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघासह ठाण्यातील चारही मतदार संघात उमेदवार उभे करण्याबाबत राज ठाकरे काहीतरी भूमिका मांडतील अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र विधानसभा निवडणुकीवर बोलणे राज ठाकरे यांनी टाळले. पत्रकार परिषद घेऊन याबाबत बोलेन असे ठाकरे म्हणाले.

मामलेदार मिसळ आणि प्रशांत कॉर्नर

ठाण्यात आले कि राज ठाकरे हे मामलेदार मिसळचा आस्वाद आवर्जून घेतात. यावेळी देखील त्यांनी आपल्या कुटुंबासमवेत मामलेदार मिसळ पावचा आस्वाद घेतला. त्यानंतर त्यांनी सुप्रसिद्ध प्रशांत कॉर्नरला देखील भेट दिली.