त्वचेचा तजेलदारपणा टिकवून ठेवण्यासाठी टिप्स

तारुण्यपिटिका आणि तेलकट त्वचेसाठी पावसाळा हा ऋतू तेलकटपणा अधिक वाढवू शकतो. या ऋतूमध्ये त्वचेचा तजेलदारपणा टिकवून ठेवण्यासाठी काही टिप्स :

१) साबण वापरण्याऐवजी सोप फ्री क्लिनर किंवा कमी तीव्रतेचा फेसवॉश वापरावा. दिवसातून २ वेळा चेहरा धुवा.

२) हलके मॉश्चरायझर ज्यात हेवी तेलांचे प्रमाण कमी असेल असे वापरावे. जसे की वॉटर बेस किंवा जेल बेस मॉश्चरायझर.

३) सनस्क्रीनचा वापर बंद करणे टाळावे. कारण अतिनील किरणे पृथ्वीपर्यंत या ऋतूतसुद्धा पोहोचतात.

४) मेकअप खूप जास्त प्रमाणात करू नये. लाईट किंवा नो मेकअपला प्राधान्य द्यावे.

५) आरोग्यदायी आहार व पाणी पिणे हे त्वचेसाठी लाभदायक असते.

६) अति आर्द्रतेमुळे त्वचेला घाम सुटू शकतो. म्हणूनच नियमित आंघोळ करणे या ऋतूमध्ये त्वचारोगांपासून दूर राहण्यासाठी उपयुक्त आहे.

७) या ऋतूत केसात कोंडा वाढतो. पावसात भिजल्यामुळे त्यात अजून वाढ होऊ शकते. तुमच्या त्वचारोग तज्ज्ञांनी दिलेला मेडिकेटेड शॅम्पू वापरणे योग्य ठरेल.

८) पावसाच्या पाण्यामुळे केस कमकुवत होऊन तुटू शकतात व गळू शकतात. त्यामुळे पावसात भिजणे टाळावे. केस शक्यतो कोरडे ठेवावेत. हेअर ड्रायरचा अति वापर टाळावा.

९) पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवण्याकडे लक्ष द्यावे. जेणेकरून बोटांच्या फटींमध्ये त्वचारोग होऊ नयेत.

लक्षात ठेवा – प्रत्येकाची त्वचा निराळी असते. त्यामुळे तुमच्या त्वचेसाठी योग्य काय असेल हे तुमच्या त्वचारोग तज्ज्ञांकडून जाणून घ्या आणि या ऋतूमध्ये तुमच्या त्वचेला तजेलदार बनवा.

डॉ. प्रज्ञा जोशी

त्वचारोग तज्ज्ञ