पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घेण्यासाठी टिप्स

पाऊस सगळ्यांनाच आवडतो. पावसात भिजायला, फिरायला मजा येते. मात्र पावसाळ्यात आरोग्याची नीट काळजी घेतली नाही तर आजारी पडण्याचा जसा धोका असतो तसाच धोका केसांनाही असतो. पावसाळ्यात केसांच्या विविध समस्या डोकं वर काढतात. केस गळतात, रुक्ष होतात, केसात कोंडा वाढतो. पावसाळ्यात केसांची नीट काळजी घेतली नाही तर केसांवर महागड्या ट्रीटमेण्ट घेण्याची गरज पडते. त्यामुळे केसांचे आणखी नुकसान होते. केसांचे आरोग्य जपण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर पावसाळ्यात देखील केस चांगले राहतात. त्यासाठी खाली दिलेल्या काही टिप्स तुम्हाला फायदेशीर नक्की ठरतील.

सध्या देशातील अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. ठाण्यात तर मागच्या २ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाळ्यात आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांचीही खास काळजी घ्यावी लागते. कारण या दिवसांमध्ये दमट वातावरणामुळे त्वचा आणि केसांवर लगेच परिणाम होतो. या दिवसात अनेकांचे केस कोरडे आणि चिकट होतात. तसेच केसांमध्ये मोठ्या प्रमाणात कोंड्याची समस्या निर्माण होते. शिवाय, पावसात भिजल्याने टाळूमध्ये बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याचाही धोका असतो. अशा परिस्थितीमध्ये पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घेण्यासाठी काही टिप्स.

– पावसाळ्यात शक्यतो केस भिजू देऊ नका. भिजल्यास केस जास्त वेळ ओले ठेवू नयेत. केस स्वच्छ पाण्याने धुवून कोरडे करावेत. वारंवार केस धुवू नयेत. आठवड्यातून २-३ वेळा केस धुवावेत. पावसाळ्यात हवेत आर्द्रता असल्याने केस जास्त शुष्क, कोरडे होऊन केसात कोंडा होण्याची शक्यता असते.

– केस निरोगी राहण्यासाठी आठवड्यातून २-३ वेळा केसांच्या मुळांना शुद्ध घाण्यावरील तेलात भृंगराज पावडर टाकून कोमट तेलाने मानेपासून वरपर्यंत केसांच्या मुळाशी हळुवार मसाज करावा. तेल वाटीत घेऊन ती वाटी गरम पाण्यात ठेवून तेल कोमट करावे.

– केस धुण्यासाठी रात्री १ चमचा मेथी पाण्यात भिजत घालावी. सकाळी उठून त्यात कडुलिंबाची पाने वाटून केसांना लावून कोमट पाण्याने केस धुवावेत.

– कडुनिंबाची पाने पाण्यात उकळवून त्या पाण्याने केस धूवावेत व नंतर पाण्यात १ लिंबाचा रस टाकून केस धुवावेत. म्हणजे केस मृदू, मुलायम व तजेलदार होतात.

– त्याचबरोबर आहाराचीही काळजी घ्यावी लागते. केसांना प्रोटीन, व्हिटॅमिन सी व इ ची गरज असते. ती आपल्याला दूध, दही, पनीर, मासे, काजू, बदाम, अंडी यातून मिळते. सुका मेवा रात्री पाण्यात भिजवून सकाळी खा. तसेच डाळी, राजमा, छोले, सोयाचंक्स, टोफू, शेंगदाणे, फळे इ.चा समावेश आहारात असावा.

– आवळा रस प्यावा किंवा रात्री आवळ्याचे चूर्ण १ चमचा पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी गाळून प्यावे.