मुंबई : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे फलाट विस्तारीकरणाचे काम सुरू असून त्यामुळे फलाट क्रमांक १२ आणि १३ ची पायाभूत कामे केली जात आहेत. त्यामुळे कोकणातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जनशताब्दी, तेजस आणि मंगळुरू एक्स्प्रेसला फटका बसला आहे. या गाड्या ३१ जानेवारीपर्यंत सीएसएमटीऐवजी ठाणे आणि दादरपर्यंतच धावतील.
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या जनशताब्दी, तेजससह मंगळुरू एक्स्प्रेस या कोकणवासीयांसाठी महत्त्वाच्या रेल्वेगाड्या आहेत. परंतु, मागील काही कालावधीपासून सीएसएमटी येथे फलाट विस्तारीकरणाचे काम केले जात आहे. त्यामुळे मंगळुरु एक्स्प्रेस ठाणे, जनशताब्दी आणि तेजस या गाड्या दादर स्थानकापर्यंत धावत आहेत. तर, आता ३१ जानेवारीपर्यंत यात वाढ केली आहे.
गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरु ते मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस ठाण्यापर्यंत चालवून अंशत: रद्द केली जाईल. गाडी क्रमांक २२१२० मडगाव ते सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १२०५२ मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस दादरपर्यंत चालवून अंशत: रद्द केली जाईल, अशी माहिती कोकण रेल्वेद्वारे देण्यात आली.