ठाणे जिल्ह्यातील तीन शिक्षक राज्य शिक्षक पुरस्काराचे मानकरी

ठाणे: राज्य शासनातर्फे देण्यात येणारा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२३-२४ जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी राज्यातील ११० शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षकांमध्ये ठाणे जिल्ह्यातील तीन शिक्षकांचा समावेश असून, उद्या ५ सप्टेंबरला शिक्षक दिनाचे औचित्य साधून या शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

ज्ञानदानासारखे महत्त्वाचे काम निस्पृहपणे आणि उत्कृष्टपणे करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी राज्य सरकारकडून राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. १९६२-६३ पासून देण्यात येणाऱ्या या पुरस्कारांचे निकष बदलून २०२१-२२ पासून या पुरस्कारांचे नामकरण क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार असे करण्यात आले. २०२३-२४ या वर्षासाठी निवड समितीने ११० शिक्षकांची नावे निवडली आहेत. मध्ये ठाणे जिल्ह्यातील तीन शिक्षकांचा समावेश आहे.

ठाणे जिल्ह्यातून प्राथमिक विभागात लक्ष्मण घागस यांना पुरस्कार जाहीर झाला असून, ते मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा तोंडली येथे सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. घागस यांनी दहा वर्षांपूर्वी या शाळेत सेमी इंग्रजी माध्यम सुरु केल्याने शाळेची पटसंख्या २२५ टक्के वाढली आहे. तर कोरोना काळात लोकसहभागातून ४ नवीन शिष्यवृत्ती अभ्यास वर्ग सुरु करून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मार्गदर्शन केले. टीटॅनच्या मार्गदर्शनामुळे ६३ टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली.

माध्यमिक विभागात वाशी येथील आय ई एस नवी मुंबई हायस्कुलच्या मनोज महाजन या यांना पुरस्कार जाहीर झाला असून, ते सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी सुधीर भोईर यांची निवड करण्यात आली आहे. भोईर हे शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा रातांधळे या शाळेत सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत आहेत.