बैलगाडा शर्यत गोळीबार प्रकरणी तिघांना अटक

गोळीबारात वापरलेली रिव्हॉल्वरही जप्त

अंबरनाथ : बैलगाडा शर्यतीच्या बैठकीच्या वेळी झालेल्या गोळीबार प्रकरणी पंढरी फडके यांच्यासह दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

राहुल पाटील आणि त्यांच्या समर्थकांवर अंधाधुंद गोळीबार प्रकरणी अखेर रविवारी रात्री उशिरा पंढरी फडके, एकनाथ फडके आणि हरिशचंद्र फडके या तीन आरोपींना खांदेश्वर येथून पोलिसांनी अटक केली आहे. तर उर्वरित आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. मात्र या गोळीबार प्रकरणामुळे अंबरनाथ शहर हादरून गेले आहे.

महाराष्ट्रात आगामी काळात बैलगाडा शर्यती कुठे कुठे आयोजित करायच्या या मुद्यावर एक बैठक आयोजित करण्यासाठी पंढरी फडके आणि राहुल पाटील यांच्या मोबाईलवर मेसेज आला होता. त्यानुसार अंबरनाथला आनंदनगर एमआयडीसीतील बोहनोली गावात ही बैठक होत असल्याने पंढरी फडके आणि राहुल पाटील त्यांच्या शेकडो समर्थकांसह रविवारी (13 ) रोजी  बोहनोलीकडे निघाले होते. मात्र एमआयडीसीच्या प्रवेशद्वाराजवळ सुदामा हॉटेलसमोर दोन्ही गट एकमेकांसमोर येताच, यांच्यात झालेल्या शाब्दीक बाचाबाचीतून पंढरी फडके यांचा चालक एकनाथ फडके याने त्यांच्याजवळ असलेल्या  बंदुकीतून राहुल पाटील यांच्या ताफ्यावर भर दिवसा भर रस्त्यात अंदाधुंद 15 ते 20 गोळ्या झाडल्या होत्या.

शिवाजीनगर पोलिसांनी पंढरी फडके याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तसेच खान्देश्वर पोलिसांच्या मदतीने रविवारी रात्री विहेगर गावातून पंढरी फडके, एकनाथ फडके आणि हरिशचंद्र फडके या तीन आरोपींना अटक करत त्यांची रिव्हॉल्वरही जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे. तिन्ही आरोपींना आज  सोमवारी उल्हासनगर सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.