१९ लाखांच्या चरससह तीन आरोपी जेरबंद

ठाणे : एक किलो ८९० ग्राम अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या आरोपी अनिल कुमार प्रजापती याला गुरुवार १३ जून रोजी सापळा रचून अटक करण्यात आली. पोलीस पथकाने याच गुन्ह्यात उत्तरप्रदेश जि -प्रयागराज येथून अर्जुनकुमार प्रजापती तर नवी मुंबईतून श्यामबाबू सरोज अशा तिघांना बेड्या ठोकण्यात यश मिळवले.

ठाणे गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने मिळालेल्या माहितीची खातरजमा करीत पोलीस पथकाने अनिलकुमार प्रजापती (४२) रा. सचिन शेठ चाळ, रूम नंबर ३, रामु नगर, पाईप लाईन रोड, भिवंडी, जि. ठाणे हा मूळचा रा. गाव दुसौती, पोस्ट सैदाबाद, तालुका हंडीया, जिल्हा प्रयागराज राज्य उत्तरप्रदेश याला १७ लाख २० हजार रुपयांचा एक किलो ७२० ग्राम अंमली पदार्थ चरससह ताब्यात घेण्यात आले. त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस पथकाने प्रयागराज जिल्ह्यात पोहचून आरोपी अर्जुनकुमार याला गुरुवार (ता-२० जून) रोजी उत्तरप्रदेशातून अटक केली. चौकशीत त्याने त्याला आज हा अंमली पदार्थ श्यामबाबू सरोज (५१) रा. ई-१, ३५ सी-३, सेक्टर ८, नेरूळ नवीमुंबई परिसरात रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करणारा आहे. तो मुळचा रा. बेलहा (गाव) सिंगमऊ, ता. हंडीया, जिल्हा प्रयागराज, राज्य उत्तरप्रदेश असून त्याला नवीमुंबई परिसरातून शुक्रवार (ता-२१ जून) रोजी अटक करण्यात आली. सोमवारी (त -२४ जून) रोजी पोलीस पथकाने त्याच्या नवीमुंबई येथील घराची झडती घेतल्यानंतर घरातून एक लाख ७० हजाराचा १७० ग्राम चरस अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला.

ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील शांती नगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एनडीपीएस गुन्ह्यात अटक केलेल्या एका आरोपीच्या चौकशीतून पोलीस पथकाने १८ लाख ९० हजाराचा अंमली पदार्थ चरस हा हस्तगत करीत एकूण तीन आरोपीना बेड्या ठोकण्यात यश मिळवले.