हे जीवन सुंदर आहे… फक्त ‘जिव्हाळा’ हवा!

पॅडी कांबळे यांनी विशेष मुलांच्या दिवाळी कार्यक्रमात दिला संदेश

ठाणे: पूर्वीप्रमाणे सण साजरे केले जात नाहीत. ते साजरे व्हायला हवेत. या सणातून जीवन किती सुंदर आहे हे कळते. विशेषतः विशेष मुलांना सुद्धा या सणांचा आस्वाद घेता यायला हवा. त्यातून त्यांचे जीवन सुंदर होईल, असे मत बिग बॉसमधील अभिनेता पंढरीनाथ कांबळे यांनी व्यक्त केले.

ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील विशेष मुलांसाठी काम करणाऱ्या जिव्हाळा ट्रस्ट ठाणे या संस्थेने दिवाळी सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यावेळी उपस्थित पॅडी अर्थात पंढरीनाथ कांबळे बोलत होते. यावेळी त्यांनी विशेष मुलांशी संवाद साधला. त्यांना फराळ भरवून त्यांच्या हातूनही फराळ खात आनंद द्विगुणित केला. यावेळी केलेल्या फटकेबाजीने मुले हरखून गेली होती.

दिवाळी सणाचे महत्त्व प्रत्येकाने जोपासले पाहिजे. हे महत्त्व आणि संस्कृती जोपासण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, असे सांगत पंढरीनाथ यांनी विशेष मुलांसाठी दिवाळीचे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले.

उपक्रमाचे यंदाचे १८वे वर्ष होते. दिवाळीनिमित्त परिसरात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. त्यामुळे वातावरणात मांगल्य निर्माण झाले होते. मुले आणि पंढरीनाथ कांबळे यांच्यात सुरू असलेल्या गमती जमतीत मुलांच्या पालकांनीही सहभाग घेतला. त्यावेळी या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. मनोरंजनाबरोबरच मुलांना सणांची माहिती व्हावी, त्याचे महत्त्व कळावे आणि त्यांच्या बौद्धिकतेला चालना मिळावी, यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते, असे संस्था संचालकांनी सांगितले.