मते आपल्याकडेच वळावीत हा प्रयत्न अंगाशी आला-जितेंद्र आव्हाड

ठाणे : संतांचा तसेच धर्माचा वापर राजकारणात करावा आणि त्यासाठी बळी द्यावेत, त्यानंतर मते आपल्याकडेच वळावीत हा प्रयत्न अंगाशी आला आहे आणि यापुढेही येईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

‘भारतरत्न’ सारखा पुरस्कार हा राष्ट्रपतींच्या हस्ते एका हॉलमध्ये प्रदान केला जातो. पण, संपूर्ण जगभर त्याचे प्रक्षेपण केले जाते. हा कार्यक्रम देखील त्यापद्धतीने करता आला असता. या कार्यक्रमाची वेळ बघितली तर कुठेही बुद्धी वापरुन काम केलेले दिसत नाही. फक्त राजकीय लाभ उठविण्यासाठी म्हणून गर्दी जमा करायची आणि आम्ही तुमच्या संतांना पुरस्कार देत आहोत असे दाखवायचे हे अत्यंत चुकीचे धोरण यामध्ये दिसत होते, असेही ते म्हणाले.

स्वत: सरकारतर्फे आव्हान केले जाते की, काम नसेल तर उन्हामध्ये जाऊ नका आणि इथे मात्र सरकारनेच लाखो लोकांना उन्हामध्ये या कार्यक्रमासाठी तडफडत बसायला लावल होते. पाण्याची व्यवस्था नाही. डोक्यावर कुठलेही छत नाही. प्रचंड ऊन. त्यामुळे मुंबईच्या वातावरणात आद्रर्ता असल्यामुळे डिहायड्रेशनचे प्रकार दिसत होते. पण, स्वत: सगळे नेते हे व्यासपीठावर एसीच्या बाजूला, स्वत:च्या डोक्यावर छत घालून बसले होते, अशी टीकाही त्यांनी केली आहे.